बीड : तीनशे कोटींचा अपहार करून फरार असलेल्या जिजाऊ माँ साहेब मल्टीस्टेटचा अध्यक्ष बबन शिंदे याला उत्तर प्रदेशच्या वृंदावन येथे बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गेल्या दीड वर्षापेक्षा अधिक काळापासून शिंदे फरार होता आणि तो पोलिसांना चकवा देत होता.
बीडसह जिल्ह्यात पाच ठिकाणच्या शाखांमधून बबन शिंदे याने तीनशे कोटींपेक्षा अधिकच्या ठेवी गोळा केल्या होत्या. दीड वर्षांपूर्वी मल्टीस्टेट बंद करून तो फरार झाला. या प्रकरणात बीडसह पाच ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. आता बीड पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. बीड जिल्ह्यामध्ये अनेक बँकांकडे हजारो ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत.
या घोटाळ्याच्या मालिकेतील सर्वांत आधी गुंतवणूकदाराची मोठी फसवणूक बबन शिंदे याच्या मल्टीस्टेट बँकेने केली होती. बीडमध्ये ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी जिजाऊ मासाहेब मल्टीस्टेट बँकेच्या अध्यक्ष अनिता शिंदे आणि त्यांचे पती बबन शिंदे यांच्यासह सर्व संचालक मंडळावर बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गेल्या वर्षी गुन्हा दाखल करण्यात आला होता.