22.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रबच्चू कडूंनी घेतली शरद पवारांची भेट, महायुतीत खळबळ

बच्चू कडूंनी घेतली शरद पवारांची भेट, महायुतीत खळबळ

पुणे : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मोदीबागेत जाऊन आज भेट घेतली. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि महायुतीच्या सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. बच्चू कडू हे महायुती समर्थक आमदार आहेत, मात्र शरद पवारांच्या भेटीनंतर ते महाविकास आघाडीत सामील होणार का अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र सध्यातरी महायुती सोडून महाविकास आघाडीसोबत जाण्याचा आपला कोणताही हेतू नाही असे म्हणत कडू यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

पवारांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, शरद पवारांसोबतची भेट ही आधीच ठरली होती. आमचा जो काल मोर्चा झाला त्यासंदर्भात आम्ही जसे राज्य सरकारला निवेदन दिले त्याचप्रमाणे या मुद्यावरून शरद पवारांशी चर्चा केली. राज्यातील शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांग बांधव आणि जे कोणी लोक अडचणीत आहेत त्यांच्या मुद्यावरून राजकारण झाले पाहिजे. ते मुद्दे घेऊन चर्चा झाली पाहिजे आणि प्रश्न निकाली लागले पाहिजेत असे बच्चू कडू म्हणाले. १ सप्टेंबरपर्यंत आम्ही महायुती सरकारला वेळ दिला आहे. शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांग बांधवांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आमच्या बांधवांच्या मागण्या पूर्ण व्हायात हीच आमची मागणी आहे असेही आमदार कडू यांनी म्हटले.

दरम्यान, महाविकास आघाडीत सामील होणार का असा सवाल केला असता शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांग बांधवांसाठी आम्ही काहीही करू असे म्हणत बच्चू कडू यांनी थेट संकेत दिले आहेत. राज्यातील महायुती सरकारला अल्टिमेटम दिला आहे. जो काही निर्णय असेल तो आम्ही १ सप्टेंबरनंतर जाहीर करू, असेही कडू म्हणाले. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील राजकारण आणखी बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR