सेलू : रामायणातील कैकेयीमाता यांचे श्रीरामावरती अत्यंत प्रेम होते. एवढेच नव्हे तर भगवान श्रीराम व भरत या दोघांनाही समान मानत असत, मात्र दुष्ट प्रवृत्तीच्या दासी मंथरेमुळे त्यांची वृत्ती बदलली. म्हणून संगतीचा दोष असतो. संगतीने चांगल्या माणसाची प्रवृत्ती बदलते, असे प्रतिपादन आशीर्वचन पर बोलताना स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले.
सेलूतील रामकथेत दि.१९ ऑक्टोबर रोजी बोलताना स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले की, दुष्ट लोकांच्या नादी लागलेली माणसं किती बिघडतात याचे उदाहरण म्हणजे कैकेयीमाता हे होत. त्यामुळे प्रत्येकांनी महान विचारांच्या व चांगल्या विचारांच्या लोकांची संगत ठेवावी. रामाला भरता इतकेच महत्त्व देणा-या कैकेयीमातेने रामाचा राज्याभिषेक सोहळा नाकारून त्याजागी भरताचा राज्याभिषेक सोहळा आणि रामाला १४ वर्षाचा वनवास हे दोन वर महाराज दशरथ यांच्याकडून घेतले आणि रामाला १४ वर्षासाठी वनवासाला पाठवण्याचे काम कैकेयीमातेमुळे घडले. त्यामुळे संगत ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे.
तसेच घरातील मांगल्य टिकून राहण्यासाठी गृहिणींनी सायंकाळी घराबाहेर पडू नये, घरामध्ये दिवे लावावेत. वेशभूषा भारतीय असावी, कपडे, खाणे पिणे, बोलण्याची मर्यादा यामुळेच घरातील मुलांवर देखील चांगले संस्कार होतात. प्राचीन गृह व्यवस्थेमध्ये वाटेल तेथे रडणे नसायचे यासाठी कोप भवन असायचे. कारण घरात वास्तू देवता कायम वास्तव्यास असते. ती आपण जे बोलतो तसेच व्हावे म्हणते. म्हणून घरामध्ये कायम मंगल बोलावे. मांगल्याचा विचार बोलल्या गेला तर मंगलच होतं. घरात दररोज चांगले बोलत गेल्यास घराचे उत्थान झाल्याशिवाय राहणार नाही. कारण शब्दांमध्ये व विचारांमध्ये सामर्थ्य आहे, असे स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी आशीर्वाचनपर बोलताना स्पष्ट केले.
आपल्या मुलांना महानतेची प्रेरणा देणा-या माता या वीरमाता असतात. माझ्या मुलांनी देशासाठी काहीतरी केले पाहिजे अशा माता जन्माला येणे गरजेचे आहेत. अशा माता जन्माला आल्या तर भारताला सुवर्णकाळ येईल. दिवसातून देवाला एकदा तरी दंडवत करणे गरजेचे आहे. मोठ्यांनी घरातील छोट्यांना वारंवार चांगल्या गोष्टी सांगत राहणे गरजेचे आहे. कपडे हे अंग झाकण्यासाठी असतात, त्यामुळे महिलांनी शीलवान महिलांचे लक्षण जपली पाहिजेत. आपले वेद जगले पाहिजेत. आपल्या मुलांना प्राचीन इतिहास व आपल्या पूर्वजांचा इतिहास सांगितला तर प्रत्येक घरात मांगल्य नांदू शकते असेही स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी आशिर्वचनपर बोलताना स्पष्ट केले.
द्वारकाधीश यांची म्हणजेच मथुरेची प्रतिकृती व्यासपीठावर सादर करून ही भागवत कथा मथुरेत सुरू असल्याची अनुभूती भाविकांना आली. संयोजकाच्या वतीने देशाचे संरक्षण करणा-या मुलांच्या पालकांचा तसेच वृक्ष संवर्धन करणारे यांचा स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.