अकोला : प्रतिनिधी
बदलापूरच्या एका नामांकित शाळेतील चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील सफाई कर्मचा-याने लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उजेडात आला. या संपूर्ण प्रकाराचे पडसाद आता राज्यासह देशातही उमटत असताना राज्यात गेल्या दोन दिवसांत अशाच प्रकारची अनेक प्रकरणे पुढे आली आहेत. बदलापूर पाठोपाठ राज्यात पुणे, अकोला, ठाणे, मुंबई येथे देखील अशाच पद्धतीने लैंगिक अत्याचाराच्या घटना उजेडात आल्या आहेत.
दरम्यान, कोलकातामध्ये काही दिवसांपूर्वी झालेली महिला डॉक्टरची हत्या, कालचे बदलापूरचे ताजे प्रकरण गाजत असताना सुसंस्कृत आणि पुरोगामी म्हणवणा-या महाराष्ट्रात नेमके चाललेय तरी काय? असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जाऊ लागला आहे.
बदलापूरच्या शाळेतील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण राज्यात गाजत असतानाच आता अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यात असाच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातल्या काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेत एका शिक्षकाने सहा विद्यार्थिनींचा छळ केल्याची ही घटना आहे.
काजीखेड येथे जिल्हा परिषदच्या उच्च माध्यमिक शाळेतील प्रमोद सरदार नामक शिक्षकाने मुलींच्या असहाय्यतेचा फायदा घेतला. आठव्या वर्गात शिकणा-या विद्यार्थिनींना अश्लील व्हीडीओ दाखवत त्यांचा छळ केल्याचा आरोप या शिक्षकावर आहे.
दरम्यान, आता या प्रकरणातील संशयित आरोपी शिक्षक प्रमोद सरदार याला सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई झाली आहे.
पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार
बदलापूर, अकोला पाठोपाठ पुण्यात देखील अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे, पुण्यातील शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील भवानी पेठ भागातील नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला आहे.
ठाण्यात धक्कादायक प्रकार
ठाण्यातील कळवा रुग्णालयात घडलेल्या एका घटनेने सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. यात एक ४२ वर्षीय इसम रुग्णालय परिसरात बागेत बसून एका अल्पवयीन मुलीशी आक्षेपार्ह वर्तन करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, त्याच वेळी रुग्णालयात कोलकाता येथील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी ज्युनियर डॉक्टर्स आंदोलन करत होते. त्यातील काही आंदोलकांना बागेत ती मुलगी आणि इसम यांच्या सुरू असलेल्या वर्तणुकीचा संशय आला असता, त्यांनी त्या ठिकाणी धाव घेत सुरक्षा रक्षकांना बोलावले. मुलीने आपण त्या व्यक्तीला ओळखत नसल्याचे सांगितले. त्यावरून सुरक्षा रक्षकांनी आणि ज्युनिअर डॉक्टरांनी त्याला धरून कळवा पोलिसांच्या ताब्यात दिले.
मुंबईत आठ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
मुंबईत चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. नागपाडा परिसरात ८ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्यने खळबळ उडाली आहे. कानातले डुल विविध प्रकारची कर्णफुले विकणा-या एकाने आठ वर्षीय चिमुकलीचं लैंगिक शोषण केले. या चिमुरडीला कानातले दाखवण्याच्या नावाखाली तिचे लैंगिक शोषण केले. या प्रकरणी पोलिसांनी लगेच कारवाई केली. कानातले टॉप्स विक्री करणा-या झुबेर शाहला नागपाडा पोलिसांनी अटक केली आहे.