33.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात वैशाख वणवा

राज्यात वैशाख वणवा

उन्हात घराबाहेर न पडण्याचा प्रशासनाचा सल्ला

पुणे : प्रतिनिधी
होळीला अग्नी दिल्यानंतर आता ख-या अर्थाने राज्यातील तापमानवाढीस सुरुवात झाली आहे. किंबहुना मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यानंतरच राज्यातील तापमानाचा आकडा मोठ्या फरकाने वाढत होता. आता मार्चच्याच अखेरीस राज्यात यंदाच्या वैशाख वणव्याच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. ज्यामुळे काहीसा आधीच हा वैशाख वणवा सहन करावा लागणार असल्याची परिस्थिती राज्यातील हवामानामुळे निर्माण झाली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार मागील दोन दिवसांपासून राज्यात उन्हाचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईचे तापमान ३५ अंशावर गेले आहे. पुढील ४ ते ५ दिवसांत तापमानात आणखी २ ते ३ अंशाची वाढ होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याशिवाय कोकणासह राज्याच्या काही भागात मंगळवारी आणि बुधवारी उष्ण आणि दमट परिस्थिती राहणार असल्यामुळे नागरिकांनी उन्हात जाणे टाळावे आणि भरपूर पाणी प्यावे अशा सूचना तज्ज्ञांनी केल्या आहेत.

पुढील ४-५ दिवसांत महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये कमाल तापमानात २-३ अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होईल. २७ मार्च रोजी कोकणातील काही भागांमध्ये उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.

बहुतांश भागात हवामान कोरडे
राज्यात मुंबईसह उपनगरीय क्षेत्रासह विदर्भातही तापमानाचा आकडा वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई आणि उपनगरांतील तापमान बुधवारपर्यंत ३८ अंशावर पोहोचू शकते. असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हे दोन्ही दिवस दमट आणि उष्ण हवा असण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील या वाढलेल्या उष्णतेचा सर्वाधिक फटका किनारपट्टी भागाला बसताना दिसणार आहे.

अनेक ठिकाणी तापमानाने केली चाळिशी पार
तापमानाचा पारा आता चांगलाच वर जात असून, पुण्यातील किमान तापमान सोमवारी १८.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे, तर कमाल तापमान ३८.९ अंशांवर आहे. सकाळपासूनच उन्हाचा कडाका जाणवू लागला आहे. येत्या चार-पाच दिवसांमध्ये राज्यात तापमानात आणखी २-३ अंश सेल्सिअस वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अकोल्यात ४१ अंश सेल्सिअस, तर सर्वांत किमान तापमान नगरला १३.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR