मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा हात सोडला. मात्र, या घटनेनंतर काँग्रेस डॅमेज कंट्रोलच्या प्रयत्नात आहे. चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी येणार आहे.
बाळासाहेब थोरात यांना राज्यसभा निवडणुका आणि सध्याच्या संघटना बांधण्याची जबाबदारी मिळणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्याकडून थोरात यांना संपर्क साधण्यात आला. नाना पटोले यांच्या भूमिकेमुळे वाढलेल्या नाराजीवर दिल्ली हायकमांडकडून सारवासारवीचा प्रयत्न सुरु झाला आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलांचा निर्णय होणार असल्याची चर्चा सुरु आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपचा हात धरलाय, पण त्यांच्यासोबत इतर काही काँग्रेसचे आमदार देखील त्यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे. अशात काँग्रेसकडून आमदारांशी संपर्क साधला जात आहे. संघटना बांधणीकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना नेत्यांना देण्यात आल्या आहेत.
काँग्रेस नेत्यांची आज बैठक पार पडली. विजय वडेट्टीवार यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका करताना म्हटले की, एक व्यक्ती गेल्याने पक्षाचा काहीही तोटा होणार नाही. तसेच मरेपर्यंत मी काँग्रेसमध्ये असेन अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडल्याने काँग्रेसला हा मोठा राजकीय धक्का आहे. मराठवाड्यातील एक बडा नेता म्हणून अशोक चव्हाण यांची ओळख आहे. वडील शंकरराव चव्हाण यांच्यापासून अशोक चव्हाण यांची नाळ काँग्रेससोबत जोडली गेली होती. काँग्रेसच्या निर्णय प्रक्रियेत अशोक चव्हाण यांचा समावेश असायचा. मात्र, तरी त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.