जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोठा लढा उभारणारे आंदोलक मनोज जरांगे यांनी शनिवारी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा सरकारविरोधात लढाई छेडली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे शस्त्र उपसले आहे. त्यातच आता त्यांनी थेट फडणवीसांनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना फालतू न बोलण्याचा इशारा दिला आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मागच्यावेळी आंदोलन, मोर्चे, बैठका, मेळावे, सभा यांमधून त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने शाब्दिक हल्ले चढवले होते. पण यावेळी त्यांच्या टार्गेटवर फडणवीसानंतर आता दुसरा भाजपचा बडा नेता असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. जरांगे म्हणाले, समाधान न व्हायला तुम्ही काय केले,फालतू बोलायचं नाही, आम्ही तुम्हाला सन्मानाने बोलतो, वाकड्यात शिरायचं नाही. तसा शहाणपणा इकडे नाही शिकवायचा, माजुरड्यासारखे बोलायचे नाही, अशा शब्दांत जरांगेंनी बावनकुळेंना खडेबोल सुनावले.
मनोज जरांगे यांनी आठ प्रमुख मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत उपोषणाला बसल्यानंतर सरकारवर टीकेची झोड उठवली. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरच तोफ डागली. जरांगेंनी भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाच फटकारले आहे. मराठा समाजाच्या भावना सरकार समजून घ्यायला तयार नाही. तुमचा राजकीय विरोध असेल किंवा मतभेद असतील,पण गरीबांशी सूड भावनेने का वागत आहे अशी विचारणा करतानात त्यांनी सग्या-सोय-याची अंमलबजावणी शिंदे नाहीच, शिवाय शिंदे समितीचे कामही बंद करून टाकले, ही कोणती पद्धत आहे, ही वागणूक चांगली नसल्याचेही जरांगेंनी यावेळी सांगितले.
यावेळी मनोज जरांगेंनी मराठ्यांशिवाय महाराष्ट्रात कोणाचेही पानसुध्दा हालत नाही, सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, पण ही आमची हक्काची लढाई आहे, आता मुख्यमंत्री फडवणीस यांनी बेईमानी करू नये, आमच्या मागण्या मान्य कराव्यात. आमची वर्चस्वाची लढाई नाही, आमचे समाजासाठी प्रामाणिक काम सुरू आहे असेही जरांगे म्हणाले.
बावनकुळे काय म्हणाले?
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणावर आपली प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले, जरांगे यांचे हे सामाजिक आंदोलन आहे. सरकारने त्यांना न्याय दिला पाहिजे ही त्यांची भूमिका आहे आणि आम्ही त्यांना न्याय देणार आहोत. त्यांना आंदोलन करण्याची मुभा आहे. एवढे न्याय देणारे सरकार राज्यात कधीच आले नाही असे बावनकुळे यांनी म्हटले होते. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजासाठी अनेक बाबी केल्या आहेत, जरांगेंचे समाधान होईल, पण जर मनोज जरांगेंचे समाधान होत नसेल तर आमचा काही पर्याय नाही. मराठा समाजाकरता ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांनी सवलती आणि आरक्षणाबद्दलचे निर्णय घेतले आहे. अजूनही मनोज जरांगे यांचे समाधान होत नसेल तर मग आता ते निर्णय घेतील त्यावर मी काही बोलू शकणार नाही अशी भूमिकाही मांडली होती.
जरांगेंच्या मागण्या काय?
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे यांसह इतर आठ प्रमुख मागण्यांसाठी सरकारविरोधात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरु केले आहेत. सग्या सोय-याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करून त्याचा कायदा करण्यात यावा, थांबलेले शिंदे समितीचे पुन्हा सुरु करावे, गॅझेट लागू व्हावे, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, दीड वर्षांपासून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरसकट कुणबीतून आरक्षण द्या अशा मागण्या त्यांनी सरकारसमोर ठेवल्या आहेत.