सोलापूर : केगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील जवळपास २८ हून अधिक ‘भावी पोलिसांनी’ गत तीन महिन्यांपासून सराव करत आपले अक्षर सुंदर केले आहे, अक्षरांना सुंदर वळण दिले आहे. पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य डॉ. वैशाली कडुकर यांच्या पुढाकाराने ही कार्यशाळा नुकतीच झाली, अक्षरमित्र अभिजित भडंगे यांनी भावी पोलिसांना प्रशिक्षण दिले.
तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असा, तुमचे अक्षर ‘सुंदर’ असले की ती तुमची एक वेगळी ओळख बनते. सुंदर अक्षर हा व्यक्तिमत्त्व विकासातील महत्त्वाचा घटक आहे. संगणक युगात हल्ली प्रत्यक्ष हाताने लिहिण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी सुंदर हस्ताक्षराचे महत्व अबाधित आहे, असे विचार पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य डॉ. वैशाली कडुकर यांनी केले.
सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील जवळपास ३० विद्यार्थ्यांनी अक्षरमित्र अभिजित भडंगे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक शुक्रवार व शनिवारी एक तास सराव करत वळणदार अक्षर लिहिण्याची कला अवगत केली, भावी पोलिस होणाऱ्या पुणे, अहमदनगर, अकोला, ठाणे, पालघर, जालना, मुंबई, बीड, धाराशिव, गडचिरोली, नांदेड, जळगाव, बुलढाणा इ. विविध जिल्ह्यातील हे विद्यार्थी आहेत.