34.7 C
Latur
Tuesday, March 4, 2025
Homeमहाराष्ट्रबीड कडकडीत बंद

बीड कडकडीत बंद

मुंडे, कराडविरोधात राज्यभर संतापाचा वणवा

बीड : बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. बीडमध्ये आज स्वयंघोषित कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे.

संतोष देशमुख यांच्या समर्थनार्थ युवकांनी बीड शहरात रॅली काढून ‘बीड बंद’ यशस्वी करण्याचे आवाहन केले. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून, पोलिसांनी बीडसह मस्साजोग गावात बंदोबस्त वाढवला आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येचे दोषारोपपत्र ‘एसआयटी’ने विशेष न्यायालयात दाखल केले. यात संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हीडीओ जोडण्यात आले आहेत. यानंतर हे फोटो आणि व्हीडीओ काल रात्री समाज माध्यमांवर व्हायरल झाले. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. याचबरोबर धनंजय मुंडे यांच्यावर मंत्रि­पदाच्या राजीनाम्याचा दबाव वाढला होता.

संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्याचे पडसाद पहिले उमटले ते, बीड जिल्ह्यात! संतोष देशमुख यांच्या समर्थनार्थ आणि मारेक-यांच्या निषेधार्थ बीडमध्ये नागरिक एकवटले होते. यावेळी नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया होत्या.
बीड जिल्हा बंदची आज हाक देण्यात आली आहे. बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बीडच्या नागरिकांनी एकत्र जमून घोषणाबाजी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, सुदर्शन घुले यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आकाची टोळी, असे फलक झळवण्यात आले.

बीड बंद यशस्वी होण्यासाठी युवकांनी दुचाकीवरून निषेध रॅली काढली होती. या रॅलीत शंभरपेक्षा जास्त युवक सहभागी झाले होते. संतोष देशमुख यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील घटनेचा निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आले. बीडमधील केजमध्ये अजित पवार, धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले याचे छायाचित्र असलेले बॅनर टायरसह जाळण्यात आले. तत्पूर्वी आंदोलकांनी यांच्या बॅनरला चपला मारण्यात आल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR