मुंबई : विधानसभा निवडणुकीत या योजनेवरून विरोधकांना चांगलाच झटका बसला. विरोधकांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ही योजना केवळ निवडणुकीपुरतीच आहे. त्यानंतर राज्य सरकार तिचा फेरविचार करेल, असा प्रचार केला होता. मंत्री अदिती तटकरे यांनी जाहीर केलेल्या नव्या निकषांमुळे विरोधकांचा तो दावा खरा ठरण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत माहिती दिली. आता या योजनेच्या लाभार्थ्यांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे एक नवा राजकीय वाद सुरू होतो की काय? अशी स्थिती आहे. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेचा निवडणुकीत महायुतीला मोठा लाभ झाला. ते पुन्हा सत्तेत आले. मोठ्या बहुमताने निवडणुका जिंकता आल्या. मंत्री तटकरे यांनी अन्य शासकीय योजनांचा लाभ घेत असलेल्या महिलांना एकत्रित लाभ दीड हजार रुपये असेल, असे महत्त्वाचे विधान केले आहे. निराधार तसेच अन्य शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांची मोठी संख्या आहे. या सर्व लाभार्थी आणि महिलांना लाडकी बहीण योजनेचा निधी मिळाला होता. नव्या निकषाची अंमलबजावणी केल्यास शासनाचा लाभ घेणा-या हजारो महिलांना त्याचा फटका बसेल. परिणामी महिला वर्गात महायुती विरोधात वातावरण निर्मिती होण्यास हातभार लागेल.
आगामी निवडणुकांवर परिणाम
येत्या दोन महिन्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका अपेक्षित आहेत. मोठ्या बहुमताने सत्तेत आल्याने महायुतीचा आत्मविश्वास वाढलेला आहे. तर विरोधकांपुढे मतदारांसमोर कोणते विषय घेऊन जावेत, ही विवंचना होती. महिला आणि बालकल्याण विकास मंत्री तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या विधानामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांना एक महत्त्वाचा मुद्दा मिळाला आहे.
राज्याच्या तिजोरीवर ताण
एकीकडे राज्याच्या तिजोरीवर रोज पडणारा नवीन भार आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांबाबत वाढलेल्या अपेक्षा आणि यापूर्वी जाहीर केलेल्या योजना आणि घोषणा यांच्या पूर्ततेसाठी आर्थिक विवंचना अशा स्थितीत लाडकी बहीण योजनेचा आढावा अपेक्षितच होता. तसाच निर्णय झालेला आहे. मात्र त्यामुळे राज्यात एका नव्या राजकीय विषयाला चालना मिळाली आहे.
लाडकी बहिण नावडती झाली : राज ठाकरे
सरकारने कालच लाडक्या बहीण नक्की कोणाला म्हणावे याचा फेरआढावा घ्यायला सुरुवात केला आहे, थोडक्यात निवडणुकीच्या आधी सरसकट लाडक्या असणा-या बहिणी आता नावडती आणि लाडकी अशा पद्धतीने विभागल्या जाणार असे दिसत आहे. असो, असे धरसोडपण योग्य नसल्याचे ठणकावत महायुतीच्या धोरणावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे.