पुणे : जगातील सर्वांत मोठी फोर्जिंग कंपनी असलेल्या भारत फोर्जकडून बारामतीत पन्नास एकर जागेवर कल्याणी टेक्नोफोर्जची मेगासाईट उभारली जाणार आहे. दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पातून १२०० लोकांना रोजगाराची प्रत्यक्ष संधी मिळणार आहे.
बारामतीत कंपनीची विस्तारवाढ केली जाणार असून प्रस्तावित प्रकल्पामध्ये अँल्युमिनियम फोर्जिंग, सुटे भाग, स्टील फोर्जिंग, असेंब्ली व सब असेंब्ली, इलेक्ट्रीक व हायब्रीड वाहनांसाठी गिअर मॅन्युफॅक्चरींग करण्याचा कंपनीचा मानस आहे. कंपनीने या साठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पन्नास एकर जमिनीची मागणी केली असून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्या प्रस्तावाला मान्यता दिली असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमूद केले.
या प्रस्तावित प्रकल्पासाठी औद्योगिकदृष्टया मागासलेल्या भागासाठी असणा-या सुविधाही मिळण्याची मागणी कंपनीकडून करण्यात आली आहे. भारत फोर्जकडून परदेशी कंपन्यांना निर्यात केली जाणार असून त्या बाबतचे कंपनीचे करारही झालेले असून तातडीने जागा देण्याची मागणी कंपनीने केलेली आहे.
देशात १२ प्रकल्प सुरू
भारत फोर्जच्या वतीने देशभरात बारा ठिकाणी अत्याधुनिक व सुसज्ज प्रकल्प उभारणअयात आले असून त्या पैकी एक छोटा प्रकल्प बारामतीत कार्यान्वित आहे. चार दशकांहून अधिकचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या कल्याणी टेक्नोफोर्जकडून विविध क्षेत्रातील उत्पादन केले जाते. उच्च दर्जा व गुणवत्ता सांभाळतानाच वेळेवर मालाची डिलीव्हरी व सर्वोत्तम दर्जा कंपनीने कायमच जपलेला आहे.
औद्योगिक क्षेत्राला मिळणार चालना
भारत फोर्ज या जगातील सर्वात मोठ्या फोर्जिंग कंपनीचा मेगा प्रोजेक्ट बारामतीत कार्यरत होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठपुरावा केला. अमित कल्याणींसोबत चर्चेनंतर त्यांनी तातडीने एमआयडीसीकडून जमिन देण्याबाबतही सूत्रे हलविली. बारामतीच्या औदयोगिक विकासाला चालना देणारा व मोठी रोजगारनिर्मिती करणारा हा प्रकल्प ठरणार आहे. सह्याद्री अँग्रोने परत केलेल्या जमिनीवर हा प्रकल्प साकारणार आहे.