नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या परराष्ट्र दौरा आणि पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकांमुळे नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रेला काही दिवस विश्रांती मिळणार आहे. उद्या, गुरुवार आणि शुक्रवारी न्याय यात्रा स्थगित राहणार आहे. त्याचप्रमाणे येत्या २६ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत न्याय यात्रा राहणार नसल्याचे काँग्रेसकडून आज स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्या १४ जानेवारीपासून सुरू झालेली ही न्याय यात्रा मणिपूर ते मुंबई जाणार आहे. आतापर्यंत मणिपूर, अरुणाचल प्रदेश, नागालँड, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, ओडिशा, छत्तीसगड राज्यातून ही यात्रा उत्तर प्रदेशात पोचली आहे. उत्तरप्रदेशातील अमेठी व रायबरेली या दोन प्रमुख जिल्ह्यातून ही यात्रा पश्चिम उत्तरप्रदेश जेथे मुस्लिम बहुल मतदार आहेत. त्या ठिकाणी पोचली आहे. न्याय यात्रा २२ व २३ फेब्रुवारीला पुढे जाणार नाही. न्याय यात्रा २४ फेब्रुवारीपासून पुन्हा मुरादाबाद येथून सुरू होईल.
केब्रिंज विद्यापीठात भाषण
भारत जोडो न्याय यात्रा संभल, अलिगड, हाथरस आणि आग्रा येथे आल्यानंतर पुन्हा २६ फेब्रुवारीपासून ही यात्रा याच ठिकाणी स्थगित राहिल. २६ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत राहुल गांधी केंिब्रज विद्यापीठात भाषण देण्यासाठी जाणार असल्याने ही यात्रा स्थगित केली आहे. तसेच याच काळात लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात दिल्लीतही काँग्रेसच्या बैठका आयोजित केल्या आहेत. या बैठकांना ते उपस्थित राहणार आहेत. यानंतर २ मार्चपासून पूर्ववतपणे ही यात्रा धौलपूर येथून सुरू होणार असल्याचे खासदार जयराम रमेश यांनी म्हटले आहे.