नवी दिल्ली : व्हेनेझुएलामध्ये खाणीखाली दबून २३ कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. आणखी अनेक कामगार खाणीत अडकल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. सोन्याच्या खाणीत खोदकाम सुरू असताना ही घटना घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बोलिव्हर राज्यातील ‘बुला लोका’ येथील अवैध खाणीत हा प्रकार घडला असून घटनास्थळी अजून शोधमोहीम सुरू असल्याचे अंगोस्तुरा नगरपालिकेच्या महापौर योर्गी अर्सिनिएगा यांनी म्हटले आहे. नागरी संरक्षण उपमंत्री कार्लोस पेरेझ एम्पुएडा यांनी ट्विटरवर या घटनेचा व्हिडिओ जारी केला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. घटनेच्या वेळी खाणीत सुमारे २०० लोक काम करत असल्याचे समजते.
अनेक कामगार खाणीच्या उथळ पाण्यात काम करत होते. जेव्हा मातीची भिंत त्यांच्यावर कोसळत होती. तेव्हा काही कामगारांना घटनास्थळावरून बाहेर पडण्यात यश आले तर अनेक जण त्यात अडकले आहेत. जखमींना प्रादेशिक राजधानी सियुदाद बोलिव्हर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. शोधकार्यात मदत करण्यासाठी कराकसमधून बचाव पथकेही पाठवण्यात आली आहेत.