नवी दिल्ली : केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात शिक्षण, नोकरी, कृषी, विज्ञान-तंत्रज्ञान यासारख्या अनेक क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजच्या तिस-या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प आणि अर्थमंत्री सीतारमण यांचा सलग सातवा अर्थसंकल्प असून तीर्थक्षेत्रासाठी मोठी घोषणा केली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बिहारमधील जगप्रसिद्ध गयाचे विष्णुपद मंदिर आणि बोध गयाचे महाबोधी मंदिर काशी विश्वनाथच्या धर्तीवर कॉरीडॉरमध्ये विकसित करण्याची घोषणा केली आहे. वाराणसीमध्ये काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉर, उज्जैनमध्ये महाकाल कॉरिडॉर, अयोध्येतील राम मंदिर, उत्तर प्रदेशमध्ये ंिवध्यवासिनी कॉरिडॉर विकसित करण्यात आले आहेत. याशिवाय देशातील इतर ठिकाणी धार्मिक पर्यटनाला जोडून विकास कामे करण्यात आली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. बिहारमधील गया आणि बोधगया येथील मंदिर कॉरिडॉर राज्याला धार्मिक पर्यटनाच्या क्षेत्रात जागतिक दर्जाची ओळख देण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
विष्णुपद मंदिराचे वैशिष्ट्य
बिहारमधील गया येथे असलेले विष्णुपद मंदिर १८ व्या शतकात राणी अहिल्याबाईंनी पुन्हा बांधले होते. असे मानले जाते की सत्ययुगाच्या काळापासून येथे भगवान विष्णूचे पाय आहेत. पितृपक्षाच्या निमित्ताने येथे देशभरातून भाविकांची गर्दी जमते.
महाबोधी मंदिराचे महत्त्व
बिहारमधील बोधगया येथे स्थित असलेले महाबोधी मंदिर हे सर्वात प्राचीन बौद्ध मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर सम्राट अशोकाने ख्रिस्तपूर्व तिस-या शतकात बांधले होते. मंदिराची उंची ५२ मीटर असून त्यामध्ये भगवान बुद्धाची सोन्याची मूर्ती स्थापित आहे. बोधगयामध्येच भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले होते, म्हणून मंदिर आणि हे शहर भिक्षूंसाठी सर्वात पवित्र मानले जाते.