पंढरपूर : येथील सेतू सुविधा केंद्रामध्ये दाखल्यासाठी सर्वसामान्यांची मोठी आर्थिक लूट होत आहे. कर्मचा-यांच्या गैरवर्तणुकीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन सेतू केंद्रावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा हलगीनाद आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात आला आहे.
पंढरपूर येथील सेतू सुविधा केंद्र गुजरात इन्फोटेक लि., या कंपनीमार्फत कंत्राट देऊन चालविण्यात येत आहे. या कंपनीने निविदेतील अटी व शर्तीनुसार प्रकल्प सादरीकरणात सांगितल्याप्रमाणे कर्मचा-यांची नियुक्ती केलेली नाही. कर्मचारी व्यसनी व उद्धट वर्तन असणारे नियुक्त केले आहेत. तसेच त्यांना ओळखपत्र, ड्रेसकोड ठेवण्यात आलेले नाहीत. त्यांचे पोलिस व्हेरीफिकेशनही केलेले नाही. सेवा केंद्रातील कर्मचा-यांनी नागरिकांना सेवा देण्याऐवजी त्यांच्याकडून अर्जंटच्या नावाखाली जास्तीची रक्कम वसूल करण्यात येते. कागदपत्रे स्कॅनिंग करण्यासाठी वेगळे शुल्क आकारले जात आहे.
रंगीत प्र्रिंटसाठीही जास्तीची रकम आकारली जात आहे. तसेच अर्ज विक्रीही मनमानी पद्धतीने केली जात आहे. सर्वसामान्य नागरिकांना हेलपाटे मारायला लावून पुन्हा अर्जेंट देतो, वाढीव रक्कम लागेल, असे सांगून सर्वसामान्य नागरिकांची लूट करण्यात येत आहे. या सर्व वाढीव शुल्कांबाबत कुठल्याही प्रकारची पावती देण्यात येत नाही. तसेच मागासवर्गीयांना जातीचे दाखले देताना वेळेमध्ये न दिल्यामुळे गोरगरीब मागासवर्गीयांची अडवणूक होऊन अनेकांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
सेतू केंद्रामध्ये टोकन डिस्प्ले सिस्टीम बसविण्यात आलेली नाही. नागरिकांना रांगेत उभे राहून त्रास सहन करावा लागत आहे. हे अतिशय गंभीर असून संबंधित कंपनीवर कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा नाईलाजास्तव आम्हास आपल्या कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन करण्यात येईल असा इशारा आरपीआय युवक प्रदेश संघटन सचिव दीपक चंदनशिवे यांनी जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.