नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. विशेषत: टीम इंडियाचा स्टार फलंदाज तिलक वर्माने इतिहास रचला आहे. त्याने एका स्थानाची झेप घेतली आहे आणि यासह तो आता दुस-या स्थानावर पोहोचला आहे. तर इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशीदने गोलंदाजीत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.
दरम्यान, आयसीसीने नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. या वर्षीच्या टी-२० क्रमवारीत अनेक बदल दिसून येत आहेत. नवीन क्रमवारीत ट्रॅव्हिस हेड पहिल्या स्थानावर आहे. त्याचे रेटिंग सध्या ८५५ आहे. दरम्यान, तिलक वर्मा एका स्थानाने पुढे सरकून दुस-या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग आता थेट ८३२ वर पोहोचले आहे.
तिलक वर्मा पहिल्यांदाच आयसीसी टी-२० क्रमवारीत दुस-या स्थानावर पोहोचला आहे. चेन्नईमध्ये खेळल्या गेलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुस-या सामन्यानंतर त्याचे रेटिंग ८४४ पर्यंत पोहोचले होते. पण तिस-या सामन्यात बाद झाल्यामुळे त्याचे रेटिंग ८३२ पर्यंत घसरले आहे. यानंतरही तो आता ट्रॅव्हिस हेडच्या खूप जवळ आला आहे आणि त्याच्या नंबर वन स्थानाला धोकाही वाढला आहे.
अष्टपैलू खेळाडूंबद्दल बोलायचे झाल्यास हार्दिक पांड्या पुन्हा एकदा अव्वल स्थानी पोहोचला आहे. पांड्या आयसीसीच्या नवीन क्रमवारीनुसार २५५ रेटिंगसह पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे. या यादीत टॉप-१० मध्ये हार्दिक पांड्या केवळ एकटा भारतीय आहे. गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये वरुण चक्रवर्तीला बंपर फायदा झाला आहे.
दरम्यान, भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेत चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरलेला इंग्लंडचा सलामीवीर फिल साल्ट याला एका स्थानाचे नुकसान झाले आहे. तो आता ७८२ रेटिंगसह तिस-या क्रमांकावर पोहोचला आहे. सध्या टॉप ५ मध्ये झालेला हा एकमेव बदल आहे. दरम्यान, भारताचा सूर्यकुमार यादव ७६३ रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही.
जोस बटलर ७४९ रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर आहे. त्याच्या पाठोपाठ सहाव्या क्रमांकावर बाबर आझम आणि सातव्या क्रमांकावर पथुम निस्सांका आहे.
वरुण २५ स्थानांची झेप घेत, पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत केलेल्या कामगिरीचे फळ त्याला मिळाले आहे. वरुणच्या खात्यात ६७९ रेटिंग गुण जमा झाले आहेत. या यादीत इंग्लंडचा आदिल रशीद ७१८ रेटिंग गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. वरुण व्यतिरिक्त अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई हे दोन गोलंदाज अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या स्थानी आहेत.