नवी दिल्ली : जनता दल युनायटेडच्या (जेडीयू) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी दिल्लीत सुरू आहे.
दरम्यान, एक मोठी बातमी समोर आली असून जेडीयू’मध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. लालन सिंह यांनी जेडीयूच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हा राजीनामा स्वीकारला आहे. जनता दल युनायटेडचे नेते केसी त्यागी यांनी शुक्रवारी सांगितले की, पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत नितीश कुमार यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. वृत्तसंस्थेने त्यागी यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
जेडीयू नेते आणि बिहारचे अर्थमंत्री विजय चौधरी यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत याबाबत प्रस्ताव आला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आता राष्ट्रीय परिषदेची बैठक होणार असून त्यात हा प्रस्ताव मंजूर झाल्यास साहजिकच ते राष्ट्रीय अध्यक्ष होतील. काही काळापासून जेडीयूच्या नेतृत्वात बदलाची चर्चा होती. नितीश कुमार हे यापूर्वी २०१६ ते २०२० पर्यंत जेडीयूचे अध्यक्ष राहिले आहेत.
जेडीयूचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते केसी त्यागी यांनी सांगितले की, पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय परिषदेची शुक्रवारी बैठक होत आहे. यामध्ये देशाच्या सध्याच्या राजकीय आणि आर्थिक परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. त्यांनी सांगितले की जेडीयू आणि इंडिया आघाडी मजबूत करणे आणि जागा वाटपावरही चर्चा केली जाणार आहे.