नवी दिल्ली : केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये इलेक्टोरल बॉण्ड्सच्या माध्यमातून तब्बल १,३०० कोटी रुपयांच्या देणग्या मिळवल्या आहेत. ही रक्कम याच काळात काँग्रेसला मिळालेल्या देणग्यांपेक्षा तब्बल सातपट अधिक आहे.
निवडणूक आयोगाला सोपवण्यात आलेल्या वार्षिक ऑडिट रिपोर्टनुसार, २०२२-२३ मध्ये भाजपला एकूण २,१२० कोटी रुपये मिळाले ज्यामध्ये एकूण ६१ टक्के हे इलेक्टोरल बॉण्ड्सच्या माध्यमातून मिळाले आहेत. यापूर्वी २०२१-२२ मध्ये पक्षाला एकूण १,७७५ कोटी रुपयांची देणगी मिळाली होती. पक्षाच्या एकूण उत्पन्नाबद्दल बोलायचे झाले तर २०२२-२३ मध्ये ते २,४६०.८ कोटी रुपये होते, जे २०२१-२२ मध्ये १,९१७ कोटी रुपये होते.
दुसरीकडे, काँग्रेसने इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून १७१ कोटी रुपये कमावले आहेत, जे २०२१-२२ या आर्थिक वर्षातील २३६ कोटी रुपयांपेक्षा कमी आहेत.
राज्य पातळीवर, समाजवादी पक्षाने २०२१-२२ मध्ये इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून ३.२ कोटी रुपये कमावले होते, पण २०२२-२३ मध्ये या बाँडद्वारे त्यांना एकही रुपया मिळाला नाही. त्याच वेळी, तेलगू देसम् पार्टी (टीडीपी)ला २०२२-२३ मध्ये इलेक्टोरल बॉण्डद्वारे ३४ कोटी रुपये मिळाले, जे मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत १० पट जास्त आहेत.
व्याजातूनही भाजपची कमाई वाढली
भाजपला गेल्या आर्थिक वर्षात २३७ कोटी रुपये व्याज म्हणून मिळाले आहेत, जे २०२१-२२ या वर्षाच्या तुलनेत १३५ कोटी रुपये अधिक आहे. निवडणूक आणि सर्वसाधारण प्रचारावरील एकूण खर्चापैकी, भाजपने विमान आणि हेलिकॉप्टरच्या वापरासाठी ७८.२ कोटी रुपये खर्च केले जे २०२१-२२ मध्ये खर्च केलेल्या ११७.४ कोटी रुपयांपेक्षा कमी आहेत. पक्षाने उमेदवारांना आर्थिक सहाय्य म्हणून ७६.५ कोटी रुपये दिले, जे २०२१-२२ साठी देण्यात आलेल्या १४५.४ कोटी रुपयांच्या तुलनेत कमी आहेत.