नवी दिल्ली : देशातील ८३ टक्के तरूण बेरोजगार आहेत, यावरून भाजप सरकारने देशातील तरूणांना रोजगार दिला नाही. हे उघड झाले आहे. यामुळे देशातील प्रत्येक तरूणांना भाजप रोजगार देणार नाही हे कळन चुकले आहे. तर पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार देखील बेरोजगारीचा प्रश्न सोडवू शकत नाही असा आरोप करत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच सर्वच पक्ष प्रचारात व्यस्त आहेत. अशातच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारादरम्यान भाजप सरकारच्या नाकर्त्यापणाचा पाढा वाचला आणि काँग्रेस तरूणांना रोजगार देणार आमच्याकडे बेरोजगारांसाठी ठोस योजना आहे असे त्या म्हणाल्या.
इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (आईएलओ) आणि इन्स्टिट्यूट ऑफ ुमन डेव्हलपमेंटने जारी केलेल्या इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्टचा हवाला देत प्रियंका गांधी म्हणाल्या की, देशातील ८३ टक्के तरुण बेरोजगार आहेत. साल २००० मध्ये बेरोजगारांमध्ये सुशिक्षित तरुणांची संख्या ३२.२ टक्के होती. तर २०२२ मध्ये ही संख्या ७५.७ टक्क-यांपर्यंत वाढली आहे. भाजप सरकारचे दहा वर्षात देशात बेरोजगारी वाढवली आहे हे सत्य आहे. भाजपने रोजगार दिला नाही. असे आज देशातील प्रत्येक तरुणाला समजले आहे. मात्र, काँग्रेस पक्षाकडे रोजगारासाठी ठोस योजना आहे असेही प्रियंका म्हणाल्या.
बेरोजगारांना काँग्रेसची हमी
प्रियांका गांधी यांनी बेरोजगारीवर मात करण्यासाठी काँग्रेसचे सरकार आले तर देशात रिक्त असलेली ३० लाख सरकारी पदे भरण्याची हमी दिली. प्रत्येक पदवीधर आणि पदविकाधारकाला शिकाऊ नोकरी दरम्यान १ लाख रुपये देण्यात येतील तर पेपरफुटीविरोधात काँग्रेस नवीन कायदा आणणार असून, जीआयईजी कामगार आणि स्टार्टअप्सच्या सामाजिक सुरक्षेसाठी ५,००० कोटी रुपयांच्या राष्ट्रीय निधीची स्थापना करण्याचे संकेतही प्रियंका यांनी दिले.