मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधी पक्षात कोणीही भ्रष्ट व्यक्ती असलेले अवडत नाही. त्यामुळे लगेच ते आपला व्हॅक्यूम क्लिनर फिरवतात व भ्रष्टाचा-यांना भाजपात घेतात, अशी उपरोधिक टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. महाविकास आघाडी महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्व ४८ जागा ंिजकणार असा विश्वास व्यक्त करताना, भाजपाचा ४५ प्लसचा आकडा हा संपूर्ण देशाचा असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर मंगळवारी शिवसेना भवन येथे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मशाल या अधिकृत चिन्हाच्या व नव्या गीताचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण झाले. यावेळी खासदार संजय राऊत, शिवसेना नेते दिवाकर रावते, सुभाष देसाई, अरंिवद सावंत, उपनेते विनोद घोसाळकर, आमदार अजय चौधरी आदी नेतेमंडळी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपावर जोरदार हल्ला चढवला. निवडणूक रोखे घोटाळ्यामुळे भाजपाचे ंिबग फुटले आहे. हा जगातील सर्वात मोठा घोटाळा आहे.
माजी अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्या काळात ही योजना आणली गेली असेल. त्यामुळे त्यांचे पती परकला यांना हा प्रकार नेमका काय आहे तो कळला असेल. त्यांनी त्याला मोदी गेट असे नाव दिले आहे, म्हणजेच जगातील सर्वांत मोठा घोटाळा. याचा सर्वोच्च न्यायालयात पर्दाफाश झाला नसता तर भाजपाला हजारो कोटी रूपये कसे आणि कोणी दिले हे कळलेच नसते आणि चंदा दो…धंदा लो, हे काम यापुढेही चालू राहिले असते, असे ठाकरे म्हणाले. मात्र, आता यानिमित्ताने यांची आता सत्ता येत नाही आहे हे उघड आहे, असे सांगतानाच हे विरोधी पक्षाला अगोदर का कळले नाही, याचा नक्कीच पश्चाताप होईल, असेही ठाकरे म्हणाले.
मशाल चिन्ह महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहचले आहे. मशाल चिन्हाने अंधेरीत विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने (ठाकरे) पहिला विजय मिळवून दिला आहे. आता या मशालीच्या आगीत ही जुमलेबाजी आणि हुकूमशाही राजवट जळून भस्म होईल, असा विश्वास व्यक्त करत ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी होणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. देश हा आपला धर्म म्हणून आपण एकत्र आहोत. जे देशभक्त आहेत त्यांनी देशासाठी एकत्र येण्याची गरज आहे. देश वाचला तर आपण वाचू आणि आपण वाचलो तर आपला धर्म वाचेल. म्हणून पहिल्यांदा हुकूमशाही हटवा, असे आवाहन करतानाच माझे आव्हान हुकूमशाहीला आहे आणि आवाहन देशप्रेमी जनतेला आहे , असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
बंडखोरीचा परिणाम नाही !
सांगलीत विशाल पाटील यांनी बंडखोरी करत दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावरूनही उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. संपूर्ण देशात हुकूमशाहीविरोधात जनमत तयार झाले आहे. आता ते फक्त मतदानाची वाट बघत आहेत. सर्व पक्षांचे जागावाटप पूर्ण झालेले आहे. तीन्ही पक्षांनी आणि महाविकास आघाडीने अधिकृत पत्रकार परिषद घेऊन जागावाटप जाहीर केले आहे. त्यामुळे आता कुठे बंडखोरीकिंवा गद्दारी होत असेल तर त्या-त्या पक्षाने जबाबदारीने त्याचा बंदोबस्त करावा. बंडखोरी झाली तरी जनता त्यांना स्थान देणार नाही, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.