23.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपने माझ्या आईला माझ्या विरोधात उतरवले..

भाजपने माझ्या आईला माझ्या विरोधात उतरवले..

बारामती : प्रतिनिधी
बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीबाबत पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्यात आले तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून देखील सुनेत्रा पवार रिंगणात उतरल्या आहेत. सुनेत्रा पवार यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर ‘भाजपने माझ्या आईला माझ्या विरोधात उतरवले’ असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सुप्रिया सुळे आज बारामती मतदारसंघातील खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या दौ-यावर आहेत. या दौ-या दरम्यान त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझी लढाई ही व्यक्तिगत नसून वैचारिक आहे भाजपच्या चुकीच्या ध्येयधोरणांबाबत माझी ही लढाई आहे. देशामध्ये भाजपाकडून दडपशाहीचे वातावरण निर्माण करण्यात आले आहे. देशात बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचार या मुद्यांवर आगामी निवडणुकीला सामोरे जाणार आहे. सध्या देशामध्ये इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार झाला आहे. हा भ्रष्टाचार जनतेसमोर आणणे आवश्यक आहे.

भाजपचे नेते बारामतीमधून येऊन विकासाच्या गोष्टी करण्यापेक्षा आम्हाला पवारांचा पराभव करायचाय अशी वक्तव्यं करत आहेत. आमचं घर फोडून आमच्या घरातली एक महिला त्यांना उमेदवार म्हणून लागत आहे. मोठी वहिनी ही आईच्या समान असते. माझ्यावरती जे संस्कार झालेत त्यानुसार मोठ्या भावाची बायको ही आईसमान असते. भारतीय जनता पक्षाने माझ्या आईला लोकसभा निवडणुकीत उतरवले असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

‘सावरकर’ हा चित्रपट राहुल गांधी पाहणार असतील तर मी पूर्ण थिएटर बुक करायला तयार आहे, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस यांनी तेच पैसे जर पाण्याचे टँकर पुरवण्यासाठी वापरले तर त्याचा फायदा या राज्यातील गरीब, कष्टकरी जनतेला होईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR