20.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeराष्ट्रीयभाजपच्या आमदार-खासदारांवर महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे

भाजपच्या आमदार-खासदारांवर महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे

अहवालात आली धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली : देशातील वातावरण सध्या कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि महाराष्ट्रात बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे चांगलेच तापले आहे. या घटनेविरोधात जनता रस्त्यावर उतरली असून आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली जात आहे.

अशातच देशात सध्या भाजपच्या सर्वाधिक लोकप्रतिनिधींवर महिला अत्याचाराविरोधातील गुन्हे दाखल असून ,त्यांची संख्या ५४ आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटीक रिफॉर्म्स’ यांचा एक अहवाल नुकताच समोर आला आहे. या अहवालात देशातील सर्व पक्षांच्या विद्यमान आमदार-खासदारांवर महिला अत्याचाराविरोधातील गुन्हे, बलात्काराचे किती गुन्हे दाखल आहेत याची माहिती देण्यात आली आहे.

असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटीक रिफॉर्म्स आणि नॅशनल इलेक्शन वॉच यांनी मिळून देशातील ४८०९ पैकी ४६९३ विद्यमान खासदार, आमदारांनी निवडणूक आयोगात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास केला. या प्रतिज्ञापत्रांतून आमदार, खासदारांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती दिलेली आहे. यामध्ये ७७६ पैकी ७५५ विद्यमान खासदार, तर ४०३३ पैकी ३९३८ आमदार यांच्या प्रतिज्ञापत्रांचा समावेश आहे. २०१९ ते २०२४ या काळात झालेल्या निवडणुकांमधल्या सगळ्या प्रतिज्ञापत्रांवरून त्यांनी ही माहिती गोळा केली असून, यामध्ये पोटनिवडणुकांचासुद्धा समावेश आहे.

अहवालात कोणत्या गुन्ह्यांचा समावेश आहे?
या अहवालात अ‍ॅसिड हल्ला, बलात्कार, लैंगिक छळ, विनयभंग, महिलेचे कपडे उतरविण्याच्या उद्देशाने तिच्यावर हल्ला करणे, महिलेचा पाठलाग करणे, वेश्याव्यवसायासाठी अल्पवयीन मुलींची खरेदी-विक्री करणे, नवरा किंवा त्याच्या नातेवाईकांकडून होणारा छळ, पहिली पत्नी असताना तिच्या संमतीशिवाय दुस-या महिलेसोबत लग्न करणे, हुंडाबळी अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.

सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यात ७५५ विद्यमान खासदार आणि ३९३८ विद्यमान आमदारांपैकी १५१ आमदार, खासदारांनी महिला अत्याचाराविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली आहे. यात १६ खासदार आणि १३५ आमदारांचा समावेश आहे.

कोणत्या पक्षाच्या किती लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल आहेत?
एकूण १५१ लोकप्रतिनिधींवर महिला अत्याचाराविरोधातील गुन्हे दाखल आहेत. यामध्ये भाजपच्या सर्वाधिक लोकप्रतिनिधींवर महिला अत्याचाराविरोधातील गुन्हे दाखल असून, त्यांची संख्या ५४ आहे. यानंतर काँग्रेसचे २३, तेलुगू देसम् पक्षाचे १७, आम आदमी पक्षाचे १३, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसच्या १० आणि उर्वरित इतर पक्षांच्या लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. तर महाराष्ट्रातल्या स्थानिक पक्षांपैकी शिवसेनेचे ३, राष्ट्रवादी आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रत्येकी एका लोकप्रतिनिधींवर महिला अत्याचाराविरोधातील गुन्हे दाखल आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR