नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आप आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा फे-या सुरू झाल्या आहेत. अशातच, आपचे दिल्लीतील किरारी विधानसभेचे आमदार ऋतुराज झा यांनी मोठा दावा केला आहे. भाजपने आम आदमी पक्षाचे आमदार फोडून भाजपमध्ये येण्यासाठी २५ कोटी रुपये आणि मंत्रिपदाची ऑफर दिल्याचा दावा त्यांनी केला. यासोबतच त्यांनी भाजपवर धमकावल्याचा आरोपही केला आहे. ऋतुराज झा यांना ज्या नंबरवरुन कॉल करुन ही ऑफर दिली, तो नंबरदेखील त्यांनी सांगितला.
दिल्ली विधानसभेत बोलताना आमदार ऋतुराज झा म्हणाले की, रामलीला मैदानावरील रॅलीनंतर मी बवाना येथील एका लग्न समारंभात गेलो होतो. तिथे तीन-चार जणांनी मला बाजुला नेले आणि म्हणाले की, तुम्हाला आम्ही अनेक दिवसांपासून समजावण्याचा प्रयत्न करत आहोत. दिल्लीमध्ये आत काहीही मिळणार नाही. दिल्लीत लवकरच राष्ट्रपती राजवट लागू होणार आहे. आपच्या १० आमदारांना सोबत घेऊन या, आम्ही प्रत्येकाला २५ कोटी रुपये देऊ आणि भाजपचे सरकार आल्यावर तुम्हाला मंत्रीपद देऊ, अशी ऑफर भाजपने दिल्याचा दावा झा यांनी केला आहे.
‘दिल्लीत राष्ट्रपती राजवट’
झा पुढे म्हणाले की, त्यांनी मला आपच्या इतर आमदारांशी बोलणी करण्यास सांगितले. मी असे करण्यास नकार दिल्यावर म्हणाले की, दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल आणि भाजपचे सरकार स्थापन होईपर्यंत ही लागू राहील. आता झा यांनी याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाकडून असे आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही फेब्रुवारीमध्ये अशा प्रकारचे आरोप केले होते.