नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशासाठी महत्वाची असणा-या नीट परीक्षेतील गोंधळावरुन काँग्रेस सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहे. आता याच मुद्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले, भाजप शासित राज्ये पेपर लीकचे केंद्र बनले आहेत, पण पंतप्रधान मोदी या मुद्द्यावर मौन बाळगून आहेत.
राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट केले की नीट परीक्षेतील २४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे आणि नरेंद्र मोदी नेहमीप्रमाणेच या मुद्यावर मौन पाळत आहेत. बिहार, गुजरात आणि हरियाणामधील अटकेवरुन स्पष्टपणे दिसून येते की, परीक्षेत पद्धतशीरपणे संघटित भ्रष्टाचार होत आहे आणि यासाठी भाजप शासित राज्ये पेपरफुटीची केंद्रे बनली आहेत.
आम्ही संसदेत आवाज उठवू
राहुल पुढे म्हणाले आम्ही आमच्या प्रतिज्ञापत्रात पेपरफुटीच्या विरोधात कठोर कायदा करुन तरुणांचे भविष्य सुरक्षित करण्याची हमी दिली होती. आता आम्ही विरोधी पक्षाची जबाबदारी पार पाडत देशभरातील तरुणांचा आवाज संसदेत पोहोचवणार आणि सरकारवर दबाव टाकून अशी कठोर धोरणे बनवण्यास भाग पाडणार असा दावाही त्यांनी यावेळी केला.