28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपची बिष्णोई गँग त्रास देतेय

भाजपची बिष्णोई गँग त्रास देतेय

संजय राऊतांची टीका

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. आचारसंहिता लागू होताच राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. महाविकास आघाडीची विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाची चर्चा पुन्हा सुरू झाली.

आतापर्यंत एकूण २८८ जागांपैकी २६० जागांचे वाटप पूर्ण झाले असून, यातील १०० जागा काँग्रेसला, तर उद्धव सेना आणि शरद पवार गटाला प्रत्येकी ८० जागा देण्यावर आघाडीतील नेत्यांनी शिक्कामोर्तब केले आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

उर्वरित २८ मित्र पक्षांसाठी सोडण्यात आल्या असून त्यावर दोन पक्षांनी दावा सांगितल्याने तो तिढा कायम असल्याचेही सांगण्यात आले. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर बोचरी टीका केली आहे.

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगाने काही जाचक आणि विरोधी पक्षांना अडचणीत आणणारे निर्णय जाहीर केले आहे. ते फक्त भाजप आणि शिंदे गटाला मदत होईल अशा पद्धतीचे निर्णय आहेत. निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय ही भाजपची बी टीम आहे. त्यामुळे निवडणूक आयोग काही करणार नसेल तर जनतेसमोर आम्हालाही विषय आणावे लागतील, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. त्यांनी काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार आम्ही जागा वाटप पूर्ण करू. कोणाची काय भूमिका आहे, हे उद्धव ठाकरेना सांगितले आहे. आम्हाला भाजपचा पराभव करायचा आहे. महाराष्ट्रातील भ्रष्ट सरकारचा पराभव आम्हाला करायचा आहे. भाजपशी कसे लढायचे हे आम्हाला माहिती आहे. भाजपने, अमित शाह यांनी, शिंदे गटाने महाराष्ट्रात सर्वांत जास्त त्रास शिवसेनेला दिला आहे. आमच्यासारखे लोक तुरुंगात जाऊन आले.

टार्गेटवर कोण आहे आणि काय होऊ शकते, ते आम्हाला माहिती आहे. भाजपच्या बिष्णोई गँग आहेत, त्यांच्याकडे हत्यारे नसतील, त्यांच्याकडे ईडी, सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणा आहेत. त्यातून त्रास दिला जातो आहे. हा त्रास सहन करून आम्ही उभे आहोत, या शब्दांत संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला.

दरम्यान, महाविकास आघाडीत काही जागांवर असलेला तिढा सोडवण्यास महाराष्ट्रातील काँग्रेस नेते सक्षम दिसत नाहीत. ते म्हणताय हायकमांडशी चर्चा करावी लागेल. आता वेळ फार नाही, वेगाने चर्चा व्हावी. त्यामुळे आम्ही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितले आहे की, लवकर निर्णय घ्यावा आणि जागा वाटप जाहीर करावे. मुकुल वासनिक, रमेश चेन्नीथला, केसी वेणूगोपाल यांच्याशी चर्चा झाली. राहुल गांधी यांच्याशी बोलणार आहे. तिढा असलेल्या जागांवर लवकर मार्ग काढावा असे आम्ही म्हणत आहोत, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR