नाशिक : प्रतिनिधी
‘एमआयएम’चे नेते ओवेसी यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली. ते म्हणाले, केंद्रात आणि आता राज्यात देखील भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. दोन्हीकडे सत्ता असल्याने त्यांनी समाजाच्या आणि जनतेच्या विकासाकडे लक्ष देण्यापेक्षा भाजपचे लक्ष खोदकामावर असून फक्त कुठे मंदिर सापडते का, याचाच विचार करण्यात ते मग्न झाले आहेत.
‘एमआयएम’चे खासदार ओवेसी यांनी नुकताच मालेगावचा दौरा केला. यावेळी नवनिर्वाचित आमदार मौलाना मुक्ती इस्माईल यांचा त्यांनी सत्कार केला. मालेगावच्या जनतेने पुन्हा एकदा मौलाना मुक्ती यांना संधी दिली आहे. या संधीचा लाभ नक्कीच मालेगावच्या जनतेला होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ओवेसी यांनी मालेगावची निवडणूक जिंकली. त्यांचा उत्साह वाढला आहे. त्यामुळे आता विधानसभे पाठोपाठ मालेगावच्या महापालिकेवरही झेंडा फडकवा, असे आवाहन पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांना केले आहे.
भाजपच्या या सरकारकडून समाजाचा आणि जनतेचा विकास होईल, अशी अपेक्षा करणे दुर्लभ झाले आहे. कोणत्याही पक्षाकडे कायमस्वरूपी सत्ता नसते. त्यामुळे सत्तेत आलेल्या पक्षाने शहाणपणाने वागायचे असते. भारतीय जनता पक्ष हे सर्व विसरला आहे. तो विकास न करता केवळ मंदिरांचा शोध घेत आहे.
राज्यातील मुस्लिम समाजाने यंदा अतिशय शहाणपणाने आणि हिमतीने मतदान केले आहे. शोषित लोकांचा आवाज या निमित्ताने विधानसभेत पोहोचला, असा दावा खासदार ओवेसी यांनी केला.