31.7 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रविधानसभा निवडणुकीसाठी भाजपची व्यवस्थापन समिती

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची व्यवस्थापन समिती

गिरीश महाजन समन्वयकपदी माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रदेश भाजपच्या वतीने व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि या समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी येथे दिली.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती निवडणूक अभियान समन्वयक म्हणून ग्राम विकासमंत्री गिरीश महाजन यांची नेमणूक करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीत १२५ जागा निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. त्या दृष्टीने पक्षाची बुथपर्यंतची यंत्रणा सक्षम करण्यासाठी पक्षातर्फे व्यवस्थापन समिती तयार करण्यात आली आहे. या समितीमध्ये ३ सहसंयोजक, विविध स्तरांवरच्या समित्यांचे प्रमुख तसेच विशेष आमंत्रित आणि पदसिद्ध सदस्यांचा समावेश आहे अशी माहिती दानवे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

विधानसभा निवडणुकीचे नियोजन, संचलन करण्यासाठी प्रदेश, जिल्हा, तालुका स्तरावर अधिवेशने झाली आहेत. विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समिती अंतर्गत विविध स्तरांवर समित्या गठित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कांबळे, अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते, आमदार श्रीकांत भारतीय यांची सहसंयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे दानवे यांनी सांगितले.

याशिवाय पक्षाने विविध समित्यांचे प्रमुख नेमले आहेत. त्यानुसार जाहीरनामा समितीप्रमुख म्हणून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, विशेष संपर्कप्रमुख म्हणून उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक संपर्कप्रमुख म्हणून राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, महिला संपर्कप्रमुख म्हणून राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, कृषी क्षेत्र संपर्कप्रमुख म्हणून अशोक चव्हाण, लाभार्थी संपर्कप्रमुख म्हणून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, युवा संपर्कप्रमुख म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, प्रचार यंत्रणाप्रमुख म्हणून सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, सहकार क्षेत्र संपर्कप्रमुख म्हणून विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर, माध्यमप्रमुख म्हणून आमदार अतुल भातखळकर, ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था संपर्कप्रमुख म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, अनुसूचित जाती संपर्कप्रमुख म्हणून माजी आमदार भाई गिरकर, अनुसूचित जमाती संपर्कप्रमुख म्हणून आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित, सोशल मीडियाप्रमुख म्हणून आमदार निरंजन डावखरे, निवडणूक आयोग संपर्कप्रमुख म्हणून माजी खासदार किरीट सोमय्या यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती दानवे यांनी दिली.

दरम्यान, व्यवस्थापन समितीवर विशेष आमंत्रित म्हणून केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, खासदार नारायण राणे, माजी मंत्री गणेश नाईक, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे दानवे यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR