21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeसोलापूरकांदा पिकाच्या विम्यात बोगसगिरी

कांदा पिकाच्या विम्यात बोगसगिरी

सोलापूर : फळबागांच्या बनावट विम्याचे लोन आता कांदा पिकांपर्यंत पोहोचले आहे. कांदा लागवड कालावधी कधी अन् किती?, विमा भरलाय कधी अन् किती?, याच्या आकडेवारीचा मेळ लावण्यासाठी कृषी खात्याला डोके खाजविण्याची वेळ आली आहे. दरम्यान, एकट्या सोलापूर जिल्ह्यात ६० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कांद्याचा बोगस विमा भरल्याचा अंदाज कृषी विभागाच्या आकडेवारीवरून दिसत आहे.

राज्यात मागील काही वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांसाठी विमा कंपनी आधार ठरत आहे. त्यातच अधिकाधिक शेतकऱ्यांनी विम्यात भाग घ्यावा या उद्देशाने राज्य शासनाने एक रुपयात पीक विमा भरण्याची सोय केली आहे. त्यामुळे विमा भरण्यासाठी शेतकरी पुढे येत असले तरी बनवेगिरी करणारे यात घुसले आहेत. राज्यात मागील दोन वर्षांपासून फळबागांचा विमा भरणारे महा ई-सेवा केंद्र व सोबत रॅकेट कार्यरत झाल्याचे उघडकीला आले आहे.

मोठ्या प्रयत्नाने फळबागांतील बनावट विमाधारक शोधण्याचे काम कृषी विभाग करीत असला तरी असे रॅकेट उद्ध्वस्त करण्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे यंदा कांदा पिकाच्या विम्यात बोगसगिरी झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यात यंदा ५ जूनपासून पाऊस सुरू झाल्याने खरीप पेरणी व कांदा पेरणी लवकर सुरू झाली होती. १५ जूननंतर कांदा पेरणी व मोजक्या रोप असलेल्या शेतकऱ्यांनी कांदा लागवड सुरू केली. पाऊस चांगला पडल्याने जिल्ह्यात दरवर्षीपेक्षा अधिक क्षेत्र कांद्याने व्यापले. मात्र, आकडेवारीत बनवाबनवी असल्याचे समोर आले. कांदा लागवड क्षेत्राची गावागावांतून कृषी खात्याकडे आलेली आकडेवारी व त्याचा जून महिन्यापासूनचा कालावधी तसेच विमा कंपनीकडे शेतकऱ्यांनी भरलेल्या आकडेवारीचा ताळमेळ कृषी खात्याला लवकर लागेना झाला आहे.

विमा कंपनीकडे नोंदलेल्या क्षेत्राच्या मोठ्या फरकाने क्षेत्राची कांदा लागवड नोंद कृषी खात्याकडे झाली आहे. यामुळे कृषी आयुक्तालयातील अधिकाऱ्यांना संशय आल्याने तपासणीचे आदेश जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाला देण्यात आले आहेत.खरीप हंगामात जिल्ह्यात ३७ हजार २३७ हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवडीची नोंद कृषी खात्याकडे झाली आहे. खरीप कांदा लागवडीचा कालावधी एक जून ते १५ सप्टेंबर हा आहे.

सोलापूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने जून व जुलै महिन्यात साधारण २३ हजार हेक्टर कांदा लागवड झाल्याचा अहवाल कृषी आयुक्तांना पाठविला होता. कृषी खात्याकडे जून व जुलै महिन्यात जिल्ह्यात २३ हजार हेक्टर कांदा लागवडीची नोंद असताना याच कालावधीत विमा कंपनीकडे ८५ हजार ३५३ हेक्टर क्षेत्राचा विमा भरणा कसा झाला? याचे उत्तर जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय शोधत आहे.

कांद्याचा खरीप हंगामातील पीक विमा ३१ जुलैपर्यंत भरण्याची मुदत होती. खरीप कांदा लागवडीचा कालावधी १५ सप्टेंबरपर्यंत असला तरी खरीप हंगामात नोंदलेला संपूर्ण कांदा लागवड जून व जुलै महिन्यात झाल्याचे गृहीत धरले तरी लागवड नोंदीप्रमाणे ३७, २३० हेक्टर क्षेत्राचा विमा क्षेत्र असायला पाहिजे.मात्र, खरीप हंगामात ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यात एक लाख ३३ हजार ४३७शेतकऱ्यांनी ८५ हजार ३५३ हेक्टर कांद्याचा विमा भरला गेला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR