सिडने : भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहन बोपण्णाने बुधवारी (२४ जानेवारी) इतिहास रचला. त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एब्डेनसह त्याने ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरी गाठली. या दोघांनी मिळून पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत मॅक्सिमो गोन्झालेझ आणि आंद्रेस मोल्टेनी या जोडीचा पराभव केला.
रोहन आणि एब्डेन यांनी अर्जेंटिनाच्या जोडीचा ६-४, ७-६ (७-५) अशा फरकाने पराभव केला. याचबरोबर रोहन बोपन्ना हा पुरूष दुहेरी टेनिसच्या इतिहासातील वर्ल्ड नंबर १ होणारा सर्वात जास्त वयाचा खेळाडू बनला आहे. रोहन बोपन्ना सध्या ४३ वर्षाचा आहे.
राजीव राम यांचा मोडला विक्रम
बोपन्नापूर्वी अमेरिकेच्या राजीव राम यांने पुरूष दुहेरी आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये सर्वात वयस्कर नंबर वन खेळाडू होण्याचा मान पटकावला होता. त्याने ऑक्टोबर २०२२ मध्ये वयाच्या ३८ व्या वर्षी हा विक्रम केला होता.
दरम्यान, रोहन बोपन्नाने २०१३ मध्ये पहिल्यांदा आपली सर्वोच्च रँकिंग मिळवली होती. तो त्यावेळी वर्ल्ड नंबर ३ बनला होता. रोहन आता लिअँडर पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झा यांच्यानंतर जागतिक दुहेरी टेनिस स्पर्धेत वर्ल्ड नंबर १ रँंिकग मिळवणारा चौथा टेनिसपटू ठरला आहे.