बस पेटविल्याने जळून खाक
पैठण : प्रतिनिधी
आईसोबत चॉकलेट आणण्यासाठी निघालेल्या एका ४ वर्षीय मुलाचा शाळेच्या बसच्या अपघातात जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त जमावाने बसची तोडफोड करीत ती पेटवून दिली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले. दरम्यान, अग्निशामक दलाला पाचारण करून पेटवून दिलेली बसची आग विझविण्यात आली. शाहरुख पठाण (४) असे मयत मुलाचे नाव आहे तर याच अपघातात मुलाची आईदेखील जखमी झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील चितेगाव येथील पांगरा रोडवर चार वर्षांचा शाहरुख पठाण आपल्या आईचे बोट धरून किराणा दुकानात जात होता. याचवेळी तिथून जाणा-या एका शाळेच्या बसने आई आणि मुलाला जोराची धडक दिली. ज्यात आई गंभीर जखमी झाली. मात्र, शाहरुख पठाण बसच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी तात्काळ अपघातग्रस्त आई आणि मुलाला रुग्णालयात दाखल केले. मात्र, मुलाला डॉक्टरांनी मयत घोषित केले. त्यानंतर संतप्त नागरिकांनी शाळेच्या बसची तोडफोड केली. त्यानंतर काही अज्ञात लोकांनी बस पेटवून दिली. ज्यात बस अक्षरश: जळून खाक झाली. दरम्यान, याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच काही क्षणात अग्निशामक दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आग विजवण्यात आली. मात्र, तोपर्यंत बस जळून खाक झाली होती.