अकोला : बारावीच्या परीक्षेमधील गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभागाने विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली आहे. तरीही बारावीच्या पहिल्याच पेपरला कॉपी पुरवण्यासाठी अजब शक्कल लढवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परीक्षा केंद्रावर बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी चक्क भाऊच तोतया पोलिस कर्मचारी बनल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
अकोला जिल्ह्यातील पातुर शहरातल्या शाहबाबू उर्दू हायस्कूल येथे बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षेदरम्यान काल, २१ फेब्रुवारीला चक्क पोलिसाचा गणवेश धारण करून केंद्रावर रुबाबात कॉपी पुरवण्यासाठी आलेल्या तोतया पोलिसाचे बिंग सॅल्यूट करतानाच फुटले आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला. अनुपम मदन खंडारे (वय २४, राहणार पांगरा बंदी) असे या तोतया पोलिसाचे नाव आहे.
बहिणीला कॉपी देण्यासाठी तरुण परीक्षा केंद्रावर इकडे तिकडे फिरू लागला. तेवढ्यात पातूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किशोर शेळके हे आपल्या ताफ्यासह या परीक्षा सेंटरवर बंदोबस्तासाठी पोहोचले. यावेळी त्या ठिकाणी अनुपम मदन खंडारे हा देखील होता.
पोलिसांच्या वरिष्ठ अधिका-यांना पाहताच तोतयाने त्यांना सॅल्यूट ठोकला. परंतु पोलिसांना त्याचा सॅल्यूट पाहून त्याच्यावर संशय आला. तसेच त्याने घातलेला गणवेश, त्यावरील नेम प्लेट चुकीची असल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याच्या पॉकेटमध्ये इंग्रजी विषयाची कॉपी चिट्स सापडल्या. या प्रकरणी ४१७, ४१९, १७०, १७१ आणि अधिनियम १९८२ चे कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.