नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) मुख्य महासंचालक नितीन अग्रवाल आणि उप विशेष महासंचालक योगेश बहादूर (वायबी) खुरानिया यांना पदावरून हटवले. दोघांनाही आपापल्या होम कॅडरमध्ये (नितीन अग्रवाल, केरळ आणि खुरानिया, ओडिशा) येथे रिपोर्ट करण्यास सांगितले आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने ३० जुलै रोजी मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीला आदेश जारी करण्यास सांगितले होते. त्यानंतर वैयक्तिक प्रशिक्षण विभागाच्या संचालक साक्षी मित्तल यांनी हे आदेश जारी केले. मात्र, या दोन्ही उच्चपदस्थ अधिका-यांना हटवण्याचे कारण आणि त्यांना कोणती जबाबदारी मिळणार, हे अद्याप सांगण्यात आलेले नाही. तसेच बीएसएफच्या नवीन प्रमुख आणि उपप्रमुखांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली नाही.
नितीन अग्रवाल हे केरळ केडरचे १९८९ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते बीएसएफचे पहिले डीजी असतील, ज्यांना त्यांचा कार्यकाळ मध्यंतरी सोडावा लागला. याआधी ज्यांनी डीजीची जबाबदारी सांभाळली, त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. अग्रवाल यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये पदभार स्वीकारला होता. त्यांचा कार्यकाळ २०२६ मध्ये पूर्ण होणार होता.
वाय. बी. खुरानिया हे १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते विशेष डीजी (पश्चिम) म्हणून पाकिस्तान सीमेवर सुरक्षा प्रभारी होते. खुरानिया यांना ओडिशातील पोलीस महासंचालक (डीजीपी) ची जबाबदारी मिळू शकते, असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे.बीएसएफची जबाबदारी मिळण्यापूर्वीच त्यांनी ओडिशा पोलिसात वरिष्ठ पदावर काम केले होते.