नवी दिल्ली : भारतीय हद्दीत घुसलेल्या बांगलादेशातील तस्करांनी बीएसएफच्या जवानावर हल्ला केला. यानंतर लष्कराने प्रत्युत्तर दिले असता एक घुसखोर मारला गेला. बांगलादेशी तस्करांनी त्रिपुराच्या साल्पोकर या सीमावर्ती भागात सोमवारी रात्री घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे.
अधिका-यांच्या मते, धारदार शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या बांगलादेशी तस्करांना भारतात अवैध वस्तूंची तस्करी करायची होती. या टोळीत एकूण १२ ते १५ तस्करांचा समावेश होता. यावेळी ड्युटीवर असलेल्या बीएसएफ जवानाने तस्करांना पाहिले आणि इतर जवानांना बोलावले.
यानंतर तस्करांनी एका बीएसएफच्या जवानाला घेरले आणि त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यानंतर आपला जीव वाचवण्यासाठी सैनिकाने आपल्या सर्व्हिस वेपनमधून दोन राऊंड गोळीबार केला आणि त्यानंतर इतर हल्लेखोर बांगलादेशात पळून गेले. परिसरात तपासणी केल्यानंतर एक बांगलादेशी तस्कर मृतावस्थेत आढळून आल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, तस्करांनी केलेल्या हल्ल्यात बीएसएफ जवानाच्या डाव्या हाताला आणि मानेला जखमा झाल्या असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.