वर्धा : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली आणि बहुजन समाज पार्टी व वंचित बहुजन आघाडीच्या मतांमध्ये घसरण झाल्याचे समोर आल्याने लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत बसपा आणि वंचित फॅक्टर ‘वंचित’ राहल्याचे दिसून आले आहे.
दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना गेल्यावेळीपेक्षा यावेळी कमी मते मिळाली. त्यामुळे ही ‘कॅडर’ बेस मते गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात असून बसपा आणि वंचित यावेळी प्रभावहीन ठरल्याचे दिसून येत आहे. अठराव्या लोकसभेसाठी वर्धा मतदार संघात दुस-या टप्प्यात २६ एप्रिल रोजी मतदान आटोपले होते. तब्बल एक महिना नऊ दिवसानंतर ४ जून रोजी मतमोजणी झाली. त्यात शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे विजयी झाले, तर भाजपचे रामदास तडस पराभूत झाले. या दोघांच्या खालोखाल बसपा आणि वंचितच्या उमेदवारांनी मते घेतली. ‘बसपा’चे डॉ. मोहन राईकवार यांना तिस-या क्रमांकाची २० हजार ७९५ मते मिळाली.
‘वंचित’चे प्रा. राजेंद्र साळुंखे १५ हजार ४९२ मते घेऊन चौथ्या स्थानी राहिले. मात्र, गेल्यावेळीपेक्षा बसपा आणि वंचितच्या उमेदवारांची मते घटली आहेत. २०१९ मध्ये बसपाचे उमेदवार शैलेशकुमार प्रेमकिशोर अग्रवाल यांना ३६ हजार ४२३ मते मिळाली होती. त्यावेळी वंचितचे उमेदवार धनराज कोठारी यांनाही ३६ हजार ४५२ मते मिळाली होती. या दोघांच्याही मतांची बेरीज ७२ हजार ८७५ होते. यावेळी बसपा आणि वंचितच्या उमेदवारांना एकूण केवळ ३६ हजार २८७ मते मिळाली आहे. अर्थात यावेळी २०१९ मध्ये बसपा आणि वंचितच्या एका उमेदवाराला मिळालेल्या मतांपेक्षाही निम्म्यापेक्षा कमी मते मिळाल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे बसपा आणि वंचितची कॅडर बेस मते नेमकी कुठे गेली, कुणीकडे वळली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दहा वर्षांपूर्वी २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत बसपाचे उमेदवार चेतन भीमराव पेंदाम यांना तब्बल ९० हजार ८६६ मते मिळाली होती. त्यावेळी वंचितचा उमेदवार रिंगणात नव्हता. एकूण २१ उमेदवार रिंगणात होते. त्यात आम आदमी पार्टीचे उमेदवार मो. अलीम पटेल मो. वहीद यांनी १५ हजार ७३८ मते घेतली होती. तत्पूर्वी २००४ मध्येही बसपाचे उमेदवार सोमराज तेलखेडे यांनी ५४ हजार नऊ मते घेतली होती. आता ही मते कुठे वळली, हा संशोधनाचा विषय झाला आहे.
२००९ मध्ये लाखाच्यावर मते
वर्धा लोकसभा मतदारसंघात बसपा आणि वंचितची ७० हजारांच्यावर मते असल्याचे नेहमी सांगितले जाते. यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ही बाब स्पष्टही झाली आहे. त्यात २००९ मध्ये तर बसपाचे उमेदवार बिपीन कंगाले यांनी तब्बल एक लाख ३१ हजार ६४३ मते मिळवून बसपाची ताकद अधोरेखित केली होती. त्यावेळी विजयी झालेले काँग्रेसचे दत्ता मेघे यांना तीन लाख ५२ हजार ८५३, तर पराभूत झालेले भाजपचे सुरेश वाघमारे यांना दोन लाख ५६ हजार ९३५ मते मिळाली होती. मेघे यांनी वाघमारे यांचा ९५ हजार ९१८ मतांनी पराभव केला होता. विजयी आणि पराभूत उमेदवारांच्या मतांमधील फरकापेक्षा कंगाले यांना तब्बल ३५ हजार ७२५ जादा मते मिळाली होती.