29.9 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeमहाराष्ट्रदादागिरी खपवून घेणार नाही; मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा

दादागिरी खपवून घेणार नाही; मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील २ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यातील एक फरार आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. इतर राज्यातून येऊन मुंबईत दादागिरी खपवून घेतली जाणार नाही अशा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी राष्ट्रवादी नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येवर शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बाबा सिद्दीकी हे लोकप्रतिनिधी होते, त्यांच्यावर ज्यांनी गोळीबार केला त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

त्यातील १ फरार आरोपी आहे त्याला शोधण्याचं काम सुरू आहे. त्याला लवकर पकडला जाईल. हा खटला फास्टट्रॅक चालवून कोर्टाकडे आरोपीला फाशी देण्याची विनंती करू. मुंबईत इतर राज्यातून येऊन आम्ही दादागिरी खपवून घेणार नाही. त्यांना जशास तसे ठोस उत्तर दिले जाईल असा इशारा त्यांनी दिला.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहमंत्री जेलमध्ये गेले होते, इतकी कायदा सुव्यवस्था बिघडली होती. उद्योगपतीच्या घराखाली स्फोटके ठेवली होती. पोलीस त्यात सहभागी होते. पोलीस प्रत्येक हॉटेलकडून वसूली करत होते. त्यावेळी कायदा सुव्यवस्था राखणारे गृहमंत्री जेलमध्ये होते. आता जो कुणी कायदा हातात घेईल त्याला सोडलं जाणार नाही. त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जातील असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही बाबा सिद्दीकी यांच्या हत्येवर प्रतिक्रिया देताना बाहेरून येणा-या गुंडावर निशाणा साधला होता. सिद्दीकी यांचा खून झाला, खून करणारी माणसं कोण, एक युपीचा आणि एक हरियाणाचा, बाहेरच्या राज्यातून लोक येतात. पोलिसांच्या देखत इतक्या लोकांसमोर खून होत आहेत असं सांगत राज ठाकरेंनी परप्रांतीयांकडून होणा-या गुन्हेगारीवर भाष्य केले होते. त्यानंतर आज मुख्यमंत्री शिंदे यांनीही इतर राज्यातून येऊन गुन्हे करणा-यांना इशारा दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR