रांची : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. खरं तर, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह २३ फेब्रुवारीपासून रांची येथे होणा-या सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याच वेळी, स्टार यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल देखील चौथ्या कसोटीचा भाग असणार नाही. बीसीसीआयने ही माहिती दिली.
बीसीसीआयने सांगितले की, बुमराहच्या कामाचा ताण कमी करण्यासाठी बोर्डाने त्याला चौथ्या कसोटीत विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी, राहुल देखील या सामन्याचा भाग होऊ शकणार नाही. आणि पाचव्या कसोटीत त्याच्या पुनरागमनाचा निर्णय त्याचा फिटनेस अहवाल आल्यानंतर होईल. बुमराहच्या जागी वेगवान गोलंदाज मुकेश कुमारचा संघात समावेश करण्यात आला आहे. तिस-या कसोटीत त्याला विश्रांती देण्यात आली होती. बुमराह सध्या या मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याने १३.६४ च्या सरासरीने १७ विकेट्स घेतल्या आहेत.
राजकोट कसोटी जिंकल्यानंतर टीम इंडियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. हैदराबादमध्ये खेळली गेलेली पहिली कसोटी गमावल्यानंतर भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन केले आणि विशाखापट्टणम आणि राजकोटमध्ये सलग दोन सामने जिंकले. आता पुढील कसोटी २३ फेब्रुवारीपासून रांचीमध्ये खेळली जाणार आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्यात खेळताना दिसणार नाही.