22.3 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeमहाराष्ट्रकर्नाटकात जाणा-या बस रद्द

कर्नाटकात जाणा-या बस रद्द

प्रवासी, कर्मचा-यांच्या सुरक्षेसाठी महामंडळाचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी
कोल्हापुरातून कर्नाटकमध्ये जाणा-या सर्व बस फे-या अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आल्या आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तसे आदेश दिले. कर्नाटकमधील चित्रदुर्गमध्ये महाराष्ट्रातील एसटी चालकाला मारहाणीची घटना घडल्यानंतर राज्य सरकारने हा आदेश दिला आहे. दरम्यान, राज्य महामंडळाच्या बसच्या चालकाला कर्नाटकात काळे फासल्याची घटना घडली. या घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले. कर्नाटकातील गाड्या आणि चालकांना काळे फासून राज्यातील कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तर दिले. यात शिंदे सेना अधिक आक्रमक झाली.

कर्नाटकात चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र एसटी मंडळाच्या एसटी बससह चालकाच्या तोंडाला काळे फासल्याची धक्कादायक घटना घडली. कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चालकाला मारहाण करत तोंडाला काळे फासले. एसटी महामंडळाच्या चालकाला कन्नड येते का? अशी विचारणा करत त्याला मारहाण करण्यात आली. चित्रदुर्ग जवळील ऐमंगळ टोल नाक्याजवळ हा प्रकार घडला. या घटनेमध्ये जखमी झालेल्या चालकाला रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले.

या आधी बेळगावात एका एसटी कंटक्टरला मारहाण करण्यात आली होती. कंटक्टरला मराठी येत नसल्याने काही तरुणांनी मारहाण केल्याचा आरोप होत होता. पण नंतर एका तरुणीशी गैरवर्तन केल्यावरून ही मारहाण झाल्याचे समोर आले. या प्रकरणी कर्नाटक बसच्या वाहकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

कोल्हापूर, पुण्यामध्ये पडसाद
या घटनेचे पडसाद पुण्यासह कोल्हापुरात उमटले. ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्नाटकातील बसेसला आंदोलकांनी काळे फासत निषेध नोंदवला. यापुढे असा प्रकार घडल्यास बसेस जाळू असा थेट इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.आता कोल्हापूरहून कर्नाटकात जाणा-या एसटी बसेस रद्द करण्याचा आदेश दिला आहे.

कोल्हापूर विभागातील बसगाड्यांबाबत निर्णय
कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालकांना कर्तव्यावर असताना शुक्रवारी रात्री काही समाजकंटकांनी धक्काबुक्की करून काळे फासले या घटनेची राज्य सरकारने दखल घेतली. राज्य सरकारकडून या घटनेचा निषेध करण्यात आला आणि सुरक्षेच्या कारणास्तव पुढील अनिश्चित काळासाठी कोल्हापूर विभागातून कर्नाटक राज्यात जाणा-या महाराष्ट्राच्या एसटी बसेस रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (प्रभारी) विवेक भीमनवार यांना दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR