17.6 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeमुख्य बातम्याराहुल गांधींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सुरक्षेत वाढ

राहुल गांधींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सुरक्षेत वाढ

नाशिक : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना बॉम्ब स्फोटात उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. राहुल गांधी यांना त्यांचे वडील राजीव गांधी यांच्यासारखे बॉम्बने उडवून देऊ, राहुल गांधी यांच्यावर न्याय जोडो यात्रेदरम्यान बॉम्ब हल्ला केला जाईल, अशी धमकी देण्यात आली होती. संबंधित वृत्तानंतर सुरक्षा यंत्रणादेखील अलर्ट झाली आहे.

याबाबतची माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने राहुल गांधी यांच्या निवासस्थान परिसरात पोलीस सुरक्षा वाढवली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्ली पोलीस, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश पोलिसांना राहुल गांधी यांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राहुल गांधी यांना सध्या झेड प्लस सुविधा आहे.

नाशिक पोलिसांच्या नियंत्रण कक्षात राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देऊ, असा धमकीचा फोन आला होता. पोलिसांना गेल्या आठवड्यात हा फोन आला होता. तेव्हापासून पोलीस अलर्टवर होते. पोलिसांनी तपास करत आरोपींना शोधून काढले आहे. यावेळी आरोपी हा एक मनोरुग्ण असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आहे. त्याने दारुच्या नशेत संबंधित कृत्य केल्याचे उघड झाले आहे.

आरोपीला आठ-दहा वर्षांपासून दारुचे व्यसन
नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील मनोरुग्णाने हा फोन कॉल केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. नाशिक पोलिसांच्या नियंत्रण कक्षात आठ दिवसांपूर्वी हा फोन आला होता. ‘‘आरोपीला आठ-दहा वर्षांपासून दारु पिण्याचं व्यसन आहे. त्याने दारुच्या नशेत फोन केला होता. या प्रकरणाचा सर्व अहवाल सुरक्षा एजन्सीजला पाठवण्यात आला आहे. राहुल गांधी यांच्या सुरक्षेची सर्व काळजी घेतली जात आहे’’, अशी माहिती नाशिकच्या एका पोलीस अधिका-याने दिली आहे.

दुसरीकडे राहुल गांधी यांच्या घराबाहेर पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राहुल गांधी यांना झेड प्लस सुरक्षा आहे. त्यामुळे त्यांच्या अवतीभवती सलग २४ तास १० पेक्षा जास्त एनएसजी कमांडो, पोलीस कर्मचा-यांसह ५५ जवान त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR