27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रपोटनिवडणूक होणार बिनविरोध

पोटनिवडणूक होणार बिनविरोध

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर निवडून द्यायच्या दोन जागांच्या पोटनिवडणुकीसाठी बुधवारी भाजपच्या वतीने धैर्यशील पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून नितीन पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी दोन जागांसाठी एकूण पाच अर्ज दाखल झाले आहेत.

केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि उदयनराजे भोसले हे लोकसभेवर निवडून गेल्याने राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त जागांमध्ये गोयल यांच्या जागेवर राष्ट्रवादीचे नितीन पाटील यांनी अर्ज दाखल केला. याशिवाय आणखी एका उमेदवाराने अर्ज भरला आहे तर उदयनराजे भोसले यांच्या जागेवर भाजपच्या धैर्यशील पाटील यांच्यासह अन्य दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या उमेदवारी अर्जांची छाननी गुरुवारी केली जाईल. तीन उमेदवारांच्या अर्जावर सूचक, अनुमोदकांच्या आवश्यक सह्या नसल्याने ते अर्ज बाद ठरतील आणि उर्वरित दोन अधिकृत उमेदवारांचे अर्ज वैध ठरून त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २६ ऑगस्ट अशी आहे. त्यामुळे या मुदतीनंतर उमेदवारांच्या निवडीची घोषणा केली जाईल. या पोटनिवडणुकीत विरोधी पक्ष महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही.

नितीन पाटील यांना चार वर्षाचा कालावधी मिळणार
केंद्रीय मंत्री पियूष गोयल हे जुलै २०२२ मध्ये महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यांची मुदत जुलै २०२८ पर्यंत होती. परंतु, भाजपने त्यांना नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. लोकसभा निवडणुकीत गोयल निवडून आले. त्यामुळे त्यांच्या जागेवर राज्यसभेवर जाणा-या नितीन पाटील यांना राज्यसभा सदस्य म्हणून काम करण्यास चार वर्षाचा कालावधी मिळणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडून येण्यापूर्वी छत्रपती उदयनराजे भोसले हे राज्यसभेचे सदस्य होते. ते एप्रिल २०२० मध्ये राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यांची मुदत एप्रिल २०२६ मध्ये संपणार होती. त्यामुळे भोसले यांच्या जागेवर राज्यसभेवर जाणा-या भाजपच्या धैर्यशील पाटील यांना खासदार म्हणून काम करण्यास दोन वर्षापेक्षा कमी कालावधी मिळेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR