बीड : प्रतिनिधी
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी पाथर्डी पाठोपाठ शनिवारी (८ जून २०२४) शिरूर शहर बंद करण्यात आले होते.
त्यानंतर आता आज रविवारी (९ जून) परळी शहर बंद करण्यात आले आहे तर सोमवारी (१० जून) वडवणी बंद पुकारण्यात आला आहे. हा बंद ओबीसी अन् वंजारी समाजाच्या वतीने पुकारण्यात आला आहे.
परळी येथील एका व्यक्तीने फेसबुकवर पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे त्यांच्या विरुद्ध परळी शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित तरुणाला अटक देखील करण्यात आली होती. या पाठोपाठ अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील शिरपूर येथील महेश तरुणांनी पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच सदरील घटनेचा निषेध म्हणून काल शिरूर शहर बंद पाठोपाठ परळी शहर ओबीसी आणि वंजारी समाज बांधवांनी बंद केले आहे. या आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यासह बीडमध्येही मोठा तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
परळी वैजनाथ येथील एका व्यक्तीने पंकजा मुंडे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याने हा सर्व प्रकार होण्यास सुरुवात झाली. यामुळे परळी तालुक्यातील जनतेत नाराजीची लाट पसरली. परळी पोलिसांनी त्या व्यक्तीस तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा देखील नोंदवला होता. या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. या पाठोपाठ शिरूर तालुक्यातील रायमोहा येथे एकाने आक्षेपार्ह पोस्ट केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा नोंद करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी काल शिरूर शहर बंद करण्यात आले होते तर रविवारी परळी वैजनाथ बंद सकल वंजारा समाज आणि ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.