28.8 C
Latur
Tuesday, January 14, 2025
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणे हा स्व.बाळासाहेबांचा अपमान !

उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणे हा स्व.बाळासाहेबांचा अपमान !

संजय राऊत यांची अमित शहांवर टीका

मुंबई (प्रतिनिधी)
शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे भारतीय जनता पक्षाची रोजीरोटी आहे. त्यांच्यावर टीका केल्याशिवाय यांचे राजकारणच होऊ शकत नाही. गद्दारांना सोबत घेऊन ज्यांनी राज्यात सरकार स्थापन केलं आणि तेच दग्या-फटक्याची भाषा करत आहेत. या देशामध्ये गद्दारीला, बेईमानीला, घटनाबा कामांना भारतीय जनता पक्षाने, नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी खतपाणी घातले आहे. उद्धव ठाकरे यांना दगाबाज म्हणणं हा स्व. बाळासाहेब ठाकरेंचा अपमान असल्याची टीका करत शिवसेना ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी आज अमित शाहा यांच्यावर पलटवार केला.

शिर्डीत भाजप पदाधिका-यांच्या मेळाव्यात बोलताना अमित शाह यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी जे दगा फटाक्याचे राजकारण केले त्याचा पराभव केल्याची टीका केली होती. खा. संजय राऊत यांनी आज शाह यांच्या टिकेचा समाचार घेतला. भाजप, मोदी शाहांमुळेच राज्यात गद्दारीला खतपाणी मिळाल्याचा आरोप त्यांनी केला.

उद्धव ठाकरे यांना दगाबाज म्हणणं हा स्व.बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे, ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर अजून तुम्ही पोट भरताय, त्यांचा हा घोर अपमान आहे. महाराष्ट्रात येऊन तुम्ही हे विधान करता आणि समोर बसलेले काही लोक त्यावर टाळ्या वाजवत होते, हा महाराष्ट्राचा अपमान आहे. शरद पवार यांनी त्यांची अख्खी हयात राजकारणात, समाजकारणात, सार्वजनिक जीवनात घालवली, आणि त्याबद्दल मोदींच्या सरकारने त्यांना देशातील दुस-या क्रमांकाचा, सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मविभूषण हा पुरस्कार दिला आहे.

महाराष्ट्रात येऊन त्याच शरद पवारांवरती सडक्या शब्दांत वक्तव्यं करणं हे भाजपच्या महाराष्ट्रतल्या नेत्यांना आवडलंय का , हा खुलासा त्यांनी करावा. राज्याबाहेरचे कोणीही लोक येतात, भले ते गृहमंत्री असोत, केंद्रीय मंत्री असोत पण ते महाराष्ट्रात येऊन असे वक्तव्य करतात व समोर बसलेले लोक ऐकून घेतात, त्यांना लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत राऊतांनी टीका केली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून शरद पवारांपर्यंत अनेक नेत्यांचं हे राज्य घडवण्यात योगदान असल्याचे राऊत म्हणाले.

परळीत पोराटोरांना मोक्का, मुख्य आरोपी मोकाट
परळीत काही पोराटोरांना त्यांनी मोक्का लावला आहे. ज्यांना मोक्का लावला आहे ते भाडोत्री आहेत. मुख्य आरोपी मोकाट आहेत. त्याच्यावर एक साधा गुन्हा टाकला आहे, त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना हे दिसत नाही का? गुंडांच्या मदतीने सरकार चालवणं ही महाराष्ट्राशी गद्दारी आहे, असे संजय राऊत यांनी सुनावले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR