31.7 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeक्रीडारांची येथील सामना रद्द करा, इंग्लंडला जा

रांची येथील सामना रद्द करा, इंग्लंडला जा

स्टोक्स-रोहितचे नाव घेत खलिस्तानी दहशतवादी पन्नूची धमकी

नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. मागील कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला. यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पुढील कसोटी सामना रांची येथे खेळवला जात आहे. मात्र, या सामन्यापूर्वी खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने धमकी दिली आहे. हा सामना रद्द करावा आणि इंग्लंड संघाने मायदेशात निघून जावे, अशी धमकी देण्यात आली आहे.

रांची येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने इंग्लंड संघाला सामना रद्द करून परतण्याची धमकी दिली आहे. याबाबत झारखंडच्या नक्षलवाद्यांना उद्देशून चिथावणीखोर विधाने केली आहेत. रांची येथे होणारा भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना त्वरित रद्द करण्यात यावा, असे पन्नूने म्हटले आहे. याप्रकरणी रांचीच्या धुर्वा पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

नक्षलवाद्यांना उद्देशून जारी करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये पन्नूने रांचीचे जेएससीए स्टेडियम आदिवासींच्या जमिनीवर बांधल्याचे म्हटले आहे. हा सामना आदिवासींच्या जमिनीवर होऊ नये, असे सांगत नक्षलवाद्यांनी झारखंड आणि पंजाबमध्ये रांची येथे होणारा कसोटी सामना रद्द होण्यासाठी कारवाया कराव्यात, अशी चिथावणी दिली आहे. पन्नूने यासंदर्भातील व्हीडीओ यूट्यूबवर जारी केल्याचा दावा केला जात आहे. याप्रकरणी रांची पोलिसांनी तपास सुरू केला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि रांचीचे डीसी राहुल सिन्हा स्वत: त्यावर लक्ष ठेवून आहेत. या धमकीच्या ऑडिओ-व्हीडीओची पडताळणी केली जात आहे.

पन्नूने यूट्यूबवरील व्हीडीओतून भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टोक्स यांना सामना खेळू न देण्याबाबत धमकी दिल्याचा दावा केला जात आहे. पन्नूने धमकी मिळाल्यानंतर झारखंड पोलिसांत खळबळ उडाली आहे. स्टेडियमपासून हॉटेलपर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. विमानतळापासून हॉटेलपर्यंतच्या प्रत्येक ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त तैनात आहे. विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. दरम्यान, भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यात २३ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी दरम्यान रांचीच्या स्टेडियमवर चौथा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR