17.2 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeसोलापूरअंगणवाडी सेविकांचा कँडल मार्च

अंगणवाडी सेविकांचा कँडल मार्च

सोलापूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान आदर्श मानून त्याप्रमाणे लोकशाही पध्दतीने आंदोलन करीत असताना सरकारकडून ते बेदखल ठरविले जात असेल तर मग हिंसक आंदोलनाची सरकार वाट पाहात आहे का? असा संतप्त सवाल अंगणवाडी कर्मचारी संघाचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी केला. शहरी भागातील सेविका व मदतनिसांनी चार हुतात्मा पुतळा, डफरीन चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत कँडल मार्च काढून सरकारचा निषेध केला. त्यावेळी झालेल्या सभेत गायकवाड बोलत होते. यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा, मानधनवाढ व इतर विविध मागण्यांसाठी सोलापूरसह राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी ४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर आहेत. त्यांच्या संपामुळे अंगणवाड्यांतील किलबिलाट थांबला असून जवळपास महिना होत आला तरी सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही. नागपूर येथे नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनातही चकार शब्द सरकारकडून काढण्यात आला नाही. महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे या तर बोलायलाही तयार नाहीत. उलट प्रशासनामार्फत दडपशाही सुरू करून कर्मचाऱ्यांना धमकावले जात असल्याचा आरोपही यावेळी गायकवाड यांनी केला. सरकारच्या या दुर्लक्षामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून उलट आंदोलन अधिक तीव्र केले आहे.

लोकशाही पध्दतीने सुरू असलेल्या आंदोलनाची सरकारला दखल घ्यावीशी वाटली नाही. मंत्रालयावरून उड्या मारण्याची सरकार वाट पाहात आहे का? असा संतप्त सवाल यावेळी करण्यात आला. या कँडल मार्च आंदोलनात अंगणवाडी कर्मचारी संघाच्या जिल्हा सरचिटणीस सरला चाबुकस्वार, उपाध्यक्षा कांचन पांढरे यांच्यासह शेकडो सेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR