मास्को : वृत्तसंस्था
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी देशाला संबोधित करताना युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या कुर्स्क भागातील ७४ गावे ताब्यात घेतली आहेत. युक्रेनचे सैन्य पुढे जात आहे आणि रशियन सैन्याला ताब्यात घेत आहे. युक्रेनने अचानक केलेल्या हल्ल्यानंतर २ लाख रशियन नागरिकांना घर सोडून पळून जावे लागले. त्यांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे.
युक्रेनने ६ ऑगस्ट रोजी रशियाच्या कुर्स्क भागावर हल्ला केला. १३ ऑगस्टपर्यंत त्यांनी १००० चौरस किमी क्षेत्र काबीज केले. दुस-या महायुद्धानंतर कोणत्याही देशाने रशियाच्या हद्दीत घुसखोरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धाला नुकतेच ९०० दिवस पूर्ण झाले. अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या या युद्धात शेवटचा आठवडा रशियासाठी अत्यंत वाईट ठरला. युक्रेनने पहिल्यांदाच रशियाला प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी कुर्स्कचे स्थानिक नेते आणि अधिका-यांंची बैठक घेतली. युक्रेनच्या हल्ल्याला त्यांनी चिथावणीखोर कृत्य म्हटले आहे. त्यांनी आपल्या संरक्षण अधिका-यांना युक्रेनियन सैन्याला रशियन हद्दीतून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. रशियाच्या भूभागावर कब्जा करून युक्रेनला युद्धविराम करारासाठी आपली स्थिती मजबूत करायची आहे. मात्र, आम्ही त्यांच्याशी कोणताही करार करणार नाही, असे पुतीन म्हणाले.
१२ किमी लांब, ४० किमी रुंद परिसरात पसरले सैनिक
युद्ध सुरू झाल्यापासून अडीच वर्षांत रशियाने युक्रेनचे १ लाख चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापले. हे युक्रेनच्या एकूण जमिनीच्या १८ टक्के आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून युक्रेनने पलटवार करत रशियाच्या तुलनेत त्यांचा एक टक्का भूभाग ताब्यात घेतला.