हिंगोली : मतदारांना आणण्यासाठी फोन पे करून पैसे पाठवतो असे वक्तव्य कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी कळमनुरी शहरामध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये केले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून आमदार संतोष बांगर यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्या वक्तव्याप्रकरणी २४ तासांत खुलासा सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या वक्तव्याचा खुलासा आमदार बांगर यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केल्यानंतर आणि वक्तव्याचा व्हीडीओची तपासणी केल्यानंतर रविवार दि. २० ऑक्टोबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या सूचनेवरून गटविकास अधिकारी गणेश बोथीकर यांनी कळमनुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीनुसार आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष बांगर यांनी काल सांगितले की मी कोणतीही वक्तव्य केलेली नाही. ती विरोधकांनी तयार केलेली कॉपी आहे. त्यामुळे माझ्या विरोधात जे काही झाले आहे ते सर्व चुकीचे आहे. विरोधकांकडे काही काम राहिलेले नाही, असा आरोप त्यांनी केला. आपल्याला निवडणूक आयोगाकडून नोटीस आलेली नाही. नोटीस आल्यानंतर नंतर सुद्धा हाच खुलासा करणार असल्याचे संतोष बांगर म्हणाले. तो व्हीडीओ माझाच आहे, पण एडिट करून आवाज लावलेला दिसतो असा दावा सुद्धा संतोष बांगर यांनी केला. ते पुढे म्हणाले की फोन पे चा अर्थ मला माहित नाही. गुगल पे सुद्धा मला माहित नसल्याचे संतोष बांगर यावेळी म्हणाले.