मुंबई : अभिनेत्री आणि राजकारणी कंगना राणावत सध्या तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. कंगनाचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट ६ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. पण सेन्सॉर प्रमाणपत्र न मिळाल्याने चित्रपट प्रदर्शित झाला नाही. मात्र आता कंगना आणि तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) च्या स्क्रीनिंग कमिटीने इमर्जन्सीला हिरवा सिग्नल दिला असून सीबीएफसीने ३ कट आणि १० बदलांसह चित्रपटाला यूए प्रमाणपत्र दिले आहे.
कंगना राणावतच्या चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनकडून यूए प्रमाणपत्र मिळाले आहे. यामुळे इमर्जन्सीच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. पण सेन्सॉर बोर्डाने चित्रपटात ३ कट आणि एकूण १० बदल केले आहेत. सीबीएफसीने चित्रपटातील तीस दृश्ये कापली आहेत, जी त्यांच्या मते आक्षेपार्ह होती. त्यानंतर त्याला यूए प्रमाणपत्र देण्यात आले आहे. दरम्यान, आता चित्रपट कधी प्रदर्शित होणार? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
चित्रपटाबाबत वाद का झाला?
वास्तविक, कंगना राणावतच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचा ट्रेलर जेव्हापासून प्रदर्शित झाला, तेव्हापासूनच वादाला तोंड फुटले आहे. शीख समुदायाने या चित्रपटाला विरोध दर्शवला होता आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला होता. त्यानंतर हे प्रकरण मुंबई आणि मध्य प्रदेश उच्च न्यायालयात पोहोचले. यावर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने सीबीएफसीला शीख गटांच्या चिंता दूर करण्याचे निर्देश दिले होते.