कोलकाता : वृत्तसंस्था
पश्चिम बंगालच्या कोलकातामधील आर. जी. कर कॉलेज आणि रुग्णालयात पोस्ट ग्रॅज्युएशनच्या दुस-या वर्षात शिकणा-या डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणी मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. आता या प्रकरणी उच्च न्यायालयाने सीबीआयकडे तपासाचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय या प्रकरणाशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज, सर्व जबाब बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत सोपवले जातील, असेही आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
पोस्ट ग्रॅज्युएशनच्या दुस-या वर्षात शिकणा-या ३१ वर्षीय तरुणीवर आरोपी संजय रॉय याने लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या केली. रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये तरुणीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळला होता. तरुणीच्या शरीरावर, तोंडावर, गुप्तांगावर गंभीर जखमा होत्या. सुरुवातीला तरुणीने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. मात्र तिच्या शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीत तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे समोर आले.
देशभरात संतापाची लाट
डॉक्टर तरुणीवर बलात्कार, तिच्या हत्येनंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. डॉक्टरांची संघटना फोर्डाने सोमवारी डॉक्टरांचा देशव्यापी संप जाहीर केला होता. पश्चिम बंगाल, कोलकाता त्याशिवाय देशभरातील अनेक ठिकाणी कँडल मार्च काढण्यात आला.