28.9 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रछ. संभाजीनगरात राडा

छ. संभाजीनगरात राडा

- महापालिकेसह पोलिसांच्या पथकावर हल्ला - अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

छ. संभाजीनगर : जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत असून, अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महानगरपालिका आणि पोलिसांच्या पथकावर हल्ला करण्यात आला आहे. शहरातील मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात हा प्रकार समोर आला आहे. यावेळी अतिक्रमणधारकांनी पोलिसांच्या पथकावर थेट दगडफेक केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरात मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात असणा-या विश्रांती नगरमध्ये पोलिस आणि नागरिकांमध्ये मोठा राडा झाला आहे.

पोलिसांसह महापालिकेचे पथक या ठिकाणी अतिक्रमण तोडण्यासाठी गेले होते. यावेळी नागरिकांनी कारवाईला विरोध करत पथकावर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून नागरिकांना पिटाळून लावले. तसेच त्यानंतर जेसीबीच्या माध्यमातून अतिक्रमण उद्ध्वस्त करण्यात आले आहे. सध्या घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर, वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

अचानक नागरिकांनी पथकावर दगडफेक सुरू केली.
आज सकाळीच अनधिकृत अतिक्रमण काढण्यासाठी मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात असणा-या विश्रांती नगरमध्ये महापालिका प्रशासन पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह दाखल झाले होते. मात्र, स्थानिक नागरिकांनी कारवाईला विरोध केला. तसेच थेट रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर काही महिलांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आणि अचानक नागरिकांनी पथकावर दगडफेक सुरू केली. अंगावर दगड येत असल्याने पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. शेवटी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि जमाव पांगवला. पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात आला असून, अतिक्रमण देखील काढण्यात येत आहे.

नागरिकांनी केली होती कारवाईची मागणी…
छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात मागील काही दिवसांपासून अवैध धंदे वाढल्याने येथील नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार केली होती. या भागात काही लोकांनी अतिक्रमण करून त्यात अवैध धंदे सुरू केले होते. त्यामुळे आज महानगरपालिकेच्या पथकासह पोलिसांचे पथक या अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी याठिकाणी गेले होते. मात्र, यावेळी अतिक्रमणधारकांनी कारवाईला विरोध करत पथकावरच हल्ला केल्याचा प्रकार समोर आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR