छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणूक निकालापूर्वी ‘सट्टा’बाजार गरम झाला आहे. महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे, एमआयएमचे इम्तियाज जलील, महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या नावांवर अनेकांनी बुकींकडे पैसे लावले आहेत. धनुष्यबाण, मशाल आणि पतंगावरून सट्टाबाजार ४ जूनपर्यंत आणखी गरम होईल. ब्लॅक मार्केटमधील समांतर अर्थव्यवस्था म्हणून सट्टाबाजाराकडे पाहिले जाते.
सट्टा हा अंदाज बांधणारा जुगार आहे. यामध्ये नशिबाच्या आणि विश्लेषणाच्या जोरावर अनेक जण लाखो रुपये लावतात. यात काही मालमाल, तर अनेक जण कंगाल होतात. १३ मे रोजी मतदान झाल्यानंतर सट्टाबाजारामध्ये महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे हे फेव्हरेट होते. खा. जलील यांच्या नावावर व खैरे यांच्या नावावर सट्टा लावण्याचे प्रमाण कमी होते.
मराठवाड्यातील जालना आणि बीड मतदारसंघांच्या निकालावरूनही सट्टाबाजारात दणकावून पैसा लावल्याची चर्चा आहे. जालन्यातून महायुतीचे उमेदवार रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, तर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांच्यात जोरदार लढत होणार असल्याची चर्चा आहे. बीडमध्ये महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे आणि महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यातही सट्टाबाजारात काँटे की टक्कर आहे.