रांची : झारखंड मुक्ती मोर्चामध्येही (झामुमो) उभी पडल्याचे उघड झाले. माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व त्यांनी सोडले आहे. या बंडाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात असून आपण कोणत्याही परिस्थितीला घाबरत नाही असे त्यांनी म्हटले आहे.
चंपई सोरेन यांनी याच आठवड्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीमध्ये भेट घेतली होती तसेच भाजप प्रवेशाबाबत रांचीमध्ये आल्यानंतर घोषणा करू असे त्यांनी म्हटले होते. चंपई सोरेन आणि त्यांच्या पुत्राचे बुधवारी येथे आगमन झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. झारखंडच्या हिताचा विचार करूनच मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असून याआधीही मी अनेकदा संघर्ष केला आहे असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
चंपई सोरेन यांनी झारखंड मुक्ती मोर्चाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, चंपई सोरेन यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला जात होता. त्यावर भाष्य करताना सोरेन यांनी आपण कोणत्याही परिस्थितीला सामोरे जायला घाबरत नाही असे म्हटले आहे. आपल्याला राज्य मंत्रिपदाचा मोह नाही त्यामुळेच आपण बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
बांगलादेशी घुसखोरांमुळे स्थानिक आदिवासींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ज्यांच्या पूर्वजांनी कधीही ब्रिटिशांची गुलामगिरी स्वीकारली नाही त्यांच्या वारसांच्या हक्काची जमीन घुसखोर बळकावत आहेत. आमच्या माता, भगिनी आणि मुलींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या प्रश्नावर केवळ भाजपच गंभीर असून अन्य पक्ष मतपेढीचे राजकारण करण्यात व्यग्र आहेत.